२००३ साली फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकल्यानंतर तनुश्री दत्ताने २००५ साली 'आशिक बनाया आपने' सिनेमातून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. या सिनेमाला आणि तनुश्रीच्या सिनेमातील परफॉर्मन्सला रसिकांची दाद मिळाली. यानंतर ती चॉकलेट, ढोल, रिस्क,स्पीड अशा विविध सिनेमातही झळकली. मात्र पहिल्या सिनेमातील यशाप्रमाणे तनुश्रीला या सिनेमांमध्ये यश मिळालं नाही. हे सिनेमा सपशेल आपटले. त्यामुळे तनुश्री हिंदी चित्रपटसृष्टीतून गायब झाली. 2010 साली रूपेरी पडद्यावर झळकलेल्या अपार्टमेंट सिनेमात तनुश्रीचं रसिकांना अखेरचं दर्शन झालं होतं.
करियरमध्ये मिळणारं अपयश तनुश्रीला रूचलं नाही. ती निराश झाली आणि याच नैराश्यातून ती डिप्रेशनमध्ये कधी गेली हे तिचं तिला कळलं नाही. त्यामुळे या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी तिने त्यावेळी आध्यात्माचा सहाला घेतला. या काळात तिने भारतातील विविध आध्यात्मिक आश्रमांमध्ये आश्रय घेतला. बराच काळ तिने कोईम्बतूर इथल्या जग्गी वासुदेव यांच्या आश्रमात घालवला. लडाख यात्रेदरम्यान तिने केशवपनही केलं.
एका मुलाखतीमध्ये तिने आपला लडाखमधील अनुभवसुद्धा शेअर केला. बुद्धिस्ट मेडिटेशन सेंटरमध्ये सरळ साध्या सोप्या श्वासोच्छवास तंत्राने खूप आराम मिळाल्याचे तिने या मुलाखतीमध्ये आवर्जून सांगितलं होतं. नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी या गोष्टी खूप फायदेशीर ठरल्याचेही तिने नमूद केले होते. यामुळे तिला नवं जीवन मिळाल्याची अनुभूती आली.
यानंतंर दोन वर्षांपूर्वी ती अमेरिकेत स्थायिक झाली होती. तिथेसुद्धा तनुश्री आणि आध्यात्माचा संबंध कायम राहिला. सेलिब्रिटी असल्याने तिथल्या विविध कार्यक्रमात तिला पाहुणी, जज, परफॉर्मर म्हणून आमंत्रित केलं जातं होतं. काही वर्षानंतर तनुश्री पुन्हा भारतात परतली आणि वेगवेगळ्या मुद्यांवर परखड मत मांडत ती चर्चेत राहिली.
तिच्याबद्दलची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची रसिकांना उत्सुकता असते. तनुश्रीने आजवर मोजकेच सिनेमा केले असले तरी ती कोट्यवधीच्या संपत्तीची मालकीण आहे. एका सिनेमात काम करण्यासाठी तनुश्री एक कोटी रुपये इतके गलेलठ्ठ मानधन घेते. मॉडेलिंग आणि सिनेमात काम करत तिने भरपूर कमाई केली आहे. आज तनुश्री जास्त सोशल मीडियावरच झळकत असली तरीही आलिशान आयुष्य ती जगते.