१९९८ साली बॉलिवूडमधील सुपरहिट क्राइम थ्रिलर चित्रपट 'सत्या' (Satya Movie) रिलीज झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. रामगोपाल वर्मा दिग्दर्शित सत्या चित्रपटातील डायलॉग आणि गाण्यांनी धुमाकूळ घातला होता. तसेच या चित्रपटातील पात्रांनीदेखील रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले होते. मग तो भीखू म्हात्रे असेल किंवा कल्लू मामा. प्रेक्षकांच्या मनात आजही या चित्रपटातील पात्रांचे स्थान कायम आहे. या चित्रपटातील सपने में मिलती है वो कुडी मेरी हे गाणं लग्न आणि पार्टीमध्ये ऐकायला मिळते.
राम गोपाल वर्माच्या या सुपरहिट चित्रपटात जे.डी.चक्रवर्ती (सत्या), उर्मिला मातोंडकर (विद्या), मनोज बाजपेयी (भीकू म्हात्रे), शेफाली शाह (प्यारी म्हात्रे), सौरभ शुक्ला (कल्लू मामा), परेश रावल (पुलिस कमिश्नर अमोद शुक्ला), मकरंद देशपांडे (अॅडव्होकेट चंद्रकांत मुले) आणि गोविंद नामदेव (भाऊ) हे कलाकार पाहायला मिळाले होते. या चित्रपटात मुख्य भूमिकेत साउथचा स्टार जे.डी. चक्रवर्ती होता. ज्याने शीर्षक भूमिका साकारली होती.
जे.डी. चक्रवर्ती सध्या काय करतोय?जे.डी.चक्रवर्ती उर्फ सत्या सध्या तमीळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम सिनेमात काम करतो आहे. मात्र आता तो निवडक सिनेमातच काम करताना दिसतो. आता तो १० वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. तो आयुषमान खुराना अभिनीत अनेक चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. याशिवाय तो मोहित सूरी दिग्दर्शित एक व्हिलन रिटर्न्समध्येही काम करताना दिसणार आहे.