स्वप्नांची दुनिया, मायानगरी, चंदेरी दुनिया अशा किती तरी नावाने चित्रपटसृष्टीला ओळखलं जातं. या झगमगत्या दुनियेत कलाकारांना रसिकांचं प्रेम, अमाप लोकप्रियता आणि बक्कळ पैसाही मिळतो. मात्र याच चित्रपटसृष्टीची जशी चांगली बाजू तशी दुसरी बाजूही आहे. कारण इथं उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची प्रथा आहे.
करिअर ऐन भरात असताना सेलिब्रिटींचं कौतुक होतं,प्रेम मिळतं. मात्र कालांतराने याच कलाकारांच्या उतारवयात किंवा पडत्या काळात कुणीच त्यांच्याकडे लक्षही देत नाही. अशी कित्येक उदाहरणं चित्रपटसृष्टीत आहेत. परवीन बाबीवरही अशीच काहीश परिस्थीती ओढावली होती. त्यांच्या पडत्या काळात त्यांच्या मदतीला कोणीही पुढे आले नाही.
आपल्या शेवटच्या दिवसांत ती एकाकी आयुष्य व्यतित करत होती. एक व्हिल चेअर, काही औषधं, पेंटिंग्स आणि कॅनव्हास हेच तिचे शेवटच्या दिवसातील सोबती होते. अखेरच्या काळात तिचे मानसिक संतूलन बिघडले होते. ती एकटीच राहू लागली होती. अखेर 2o जानेवारी 2005 रोजी परवीनने या जगाचा निरोप घेतला.
मुळात ७० च्या दशकात परवीन बाबी यांनी त्यांच्या सौंदर्याने फक्त चाहत्यांनाच नाही तर अनेक अभिनेत्यांना अक्षरशः वेड लावलं होतं. १५ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी जवळपास ५० सिनेमांत काम केलं यातील १२ सिनेमे त्यांनी अमिताभ यांच्यासोबत केले.
७० च्या दशकात परवीन बाबी या सर्वात महागड्या अभिनेत्री होत्या. यश, स्टारडम, पैसा या सर्व गोष्टी परवीन बाबी यांनी कमावल्या होत्या.इतकेच काय तर त्या काळात टाईम मॅगेझिनवर झळकणारी पहिली भारतीय अभिनेत्री परवीन बाबीच होती.
ऑनस्क्रीन ग्लॅमरस दिसणा-या परवीन बाबीचे खरे आयुष्यही एकदम रॉकींग असेल असे वाटुही शकते मात्र आयुष्य वादग्रस्त राहिले आहे. सर्वप्रथम अभिनेता डॅनीसोबत तिचे नाव जुळले. हे प्रेमप्रकरणही खूप गाजले होते.
डॅनीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर कबीर बेदींचीसह तिचे अफेअर सुरु झाले आणि दोघेही लिव्ह इनमध्ये राहत होते.मात्र काही कारणामुळे दोघेही वेगळे झाले. त्यानंतर महेश भट परवीनच्या आयुष्यात आले.
जवळजवळ तीन वर्षे हे दोघे सोबत होते. मात्र त्यांचे नातेही लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही.महेश भट्ट यांच्यासोबत नाते तुटल्यानंतर आयुष्यातील तणाव अधिकच वाढला होता.