टुनटुन (Tun Tun) या अभिनेत्रीने प्रेक्षकांना खळखळून हसवलं आणि 2003 मध्ये आजच्याच दिवशी म्हणजे 24 नोव्हेंबरला जगाचा निरोप (Tun Tun Death Anniversary ) घेतला. आज तिचा स्मृतीदिन..
उमा देवी हे टुनटुन यांचं खरं नाव. युपीच्या अमरोही जिह्यातल्या एका छोट्याशा गावात उमाचा जन्म झाला आणि जन्मासोबतच जणू संकटाची मालिका तिच्या पाठी लागली. घरची परिस्थिती बेताची... आई जन्म देताच गेली आणि जमिनीच्या वादातून तिच्या वडिलांचाही खून झाला. उमा अगदी लहान वयात पोरकी झाली. काकांनी तिचा सांभाळ केला. पण सांभाळ म्हणजे काय तर दोन वेळचं उरलंसुरलं जेवण.
लहान वयात स्वयंपाक, धुणी-भांडी करायचं आणि मिळेल ते गिळायचं. शिकण्याची परवानगी नव्हती. पण उमा जिद्दीची होती. ती भावंडांच्या पुस्तकातून वाचायला शिकली आणि रेडिओवरची गाणी ऐकून गायला लागली. आवाज सुरेल होताच. सगळे कौतुक करत. हे कौतुक ऐकून उमाने गायिका व्हायचं स्वप्नं बघितलं आणि हे स्वप्न मनाशी कवटाळून 17-18 वर्षांची उमा घरातून पळाली. सोबत एक मैत्रिण होती. दोघीही थेट मुंबईला पोहोचल्या आणि संगीतकार नौशाद यांच्या घरी धडकल्या. नौशाद भेटले, पण ते तिला काम का म्हणून देणार? मग उमाने थेट धमकीच दिली. मला काम द्या, नाहीतर मी समुद्रात उडी मारून जीव देईन, अशी बेधडक बोलून ती मोकळी झाली. तिचा हाच बेधडकपणा कदाचित नौशाद यांना भावला आणि त्यांनी तिचा तिला ‘वामिक आझरा’ या चित्रपटात गाण्याची संधी दिली. ‘दर्द’ या चित्रपटातील एका गाण्यानं तर कमाल केली.
‘अफसाना लिख रही हूं दिले बेकरार का...,’ हे उमाचं गाणं देशाच्या कानाकोप-यात गाजलं. तिथून पुढे उमाला साईन करण्यासाठी निर्मात्यांची रांग लागली. पण एका कराराचा भंग केल्याचं निमित्त झालं आणि उमाच्या गाण्याच्या करिअरला उतरती कळा लागली. लता व आशा या मंगेशकर भगिनींचा उदय हेही तिला काम न मिळण्याचं एक कारण ठरलं. तिची अनेक गाणी लता मंगेशकर यांच्याकडे गेली. पुढं काय? हा मोठा प्रश्न तिला सतवायला लागला आणि याही वेळी नौशाद हेच तिच्या मदतीला धावून आलेत.
उमा दिसायला देखणी नव्हतीच. वजनही प्रचंड होतं. पण विनोदबुद्धी तुफान होती. अनेकदा ती स्वत:च्या जाडेपणावर स्वत:च जोक मारायची. नौशाद यांनी तिची ही विनोदबुद्धी हेरली आणि तिला सिनेमात काम करण्याचा सल्ला दिला. उमाला हा सल्ला पटला. पण एक अट होती. पहिला सिनेमा करेल तर तो फक्त दिलीप कुमारसोबतच. दिलीप कुमार त्यावेळचे सुपरस्टार होते. पण नौशाद यांनी उमाचं हे स्वप्नही साकार केलं. त्यांनी शिफारस केली आणि ‘बाबुल’मध्ये उमाची वर्णी लागली. दिलीपकुमारसोबत नर्गिस होती आणि उमाचा एक छोटासा रोल होता. या चित्रपटासोबतच उमाचं ‘टुनटुन’ हे नामकरणही झालं.
हो, दिलीप कुमार यांनीच एका दृश्याच्या चित्रीकरणादरम्यान उमा देवीला टुनटुन हे नाव दिलं आणि पुढे टुनटुनची कॉमेडी बघून प्रेक्षक भारावून गेलेत. पहिली महिला विनोदी कलाकार म्हणून टुनटुन ओळखली जाऊ लागली. अगदी तिच्या नावावर सिनेमा चालू लागला.टुनटुन यांनी सुमारे 200 चित्रपटांत त्यांनी काम केलं. या सर्व चित्रपटात तिच्या वाट्याला कॉमेडी रोल तेवढेच आलेत. तिच्या जाडेपणावर जोक्स झालेत. पण तिने ते खिलाडूवृत्तीने स्वीकारले. पन्नास वर्ष ती सिनेइंडस्ट्रीत वावरली आणि 24 नोव्हेंबर 2003 ला जगाला अलविदा म्हणत कायमची निघून गेली...