Join us

रेमो डिसुझा म्हणतोय या व्यक्तीमुळेच वाचले माझे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 5:27 PM

तो देवदूतासारखा माझ्या मदतीसाठी धावत आला असे म्हणत रेमोने त्या व्यक्तीचे आभार मानले आहेत.

ठळक मुद्देमी कधीच सलमान यांच्यासोबत जास्त बोलत नाही. केवळ ओके सर, यस सर येवढेच माझे त्यांच्यासोबत बोलणे होते. पण माझ्या पत्नीसोबत त्यांचे नाते खूपच चांगले आहे.

कोरिओग्राफर रेमो डिसुझाला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्याची तब्येत आता सुधारत असून एका व्यक्तीमुळे माझे प्राण वाचले, तो देवदूतासारखा माझ्या मदतीसाठी धावत आला असे म्हणत रेमोने अभिनेता सलमान खानचे आभार मानले आहे.

रेमोने बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, माझी तब्येत पाहून सगळ्यांना प्रचंड धक्का बसला होता. मला देखील काय होतं हे कळत नव्हते. दररोजप्रमाणे मी माझा नाश्ता केला आणि व्यायाम करण्यासाठी जीममध्ये गेलो. माझी बायको लीझल आणि माझा ट्रेनर एकच आहे. तिचा व्यायाम झाल्यानंतर मी व्यायाम करण्यासाठी उठलो तर मला माझ्या छातीत दुखायला लागले. अ‍ॅसिडिटीमुळे जळजळ होत असेल असे मला वाटत होते. मी पाणी प्यायले. पण मला बरे वाटतच नव्हते. त्यामुळे आज मी ट्रेनिंग करत नाही, मी घरी जातो असे सांगत मी निघालो. लिफ्टची वाट पाहात मी उभा होतो. पण माझ्यात उभे राहाण्याची देखील ताकद नव्हती. मी तसाच तिथे खाली बसलो. कसातरी मी लिफ्टच्या आत शिरलो. पण तिथून बाहेर पडताना मला उलटीसारखे व्हायला लागले. 

पुढे रेमोने या मुलाखतीत सांगितले की, माझ्या स्मार्टवॉचमध्ये इसीजी आणि हार्टबीट याची नोंद होते. पण घड्याळ्याच्या स्क्रिनवर तुम्हाला बरे वाटत नाही आहे का असे दाखवले जात होते. मला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले. मला हृदयविकाराचा झटका आल्याचे माझ्या कुटुंबियांना डॉक्टरांनी सांगितले. 

सलमानने केलेल्या मदतीविषयी रेमोने सांगितले की, मी कधीच सलमान यांच्यासोबत जास्त बोलत नाही. केवळ ओके सर, यस सर येवढेच माझे त्यांच्यासोबत बोलणे होते. पण माझ्या पत्नीसोबत त्यांचे नाते खूपच चांगले आहे. तिने त्यांना फोन केला. मला चांगल्यातले चांगले उपचार मिळाले पाहिजेत असे त्यांनी रुग्णालयाच्या मंडळींना सांगितले होते. एवढेच नव्हे तर माझ्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ते सतत तेथील डॉक्टरच्या संपर्कात होते.  

टॅग्स :रेमो डिसुझा