Join us

'त्रिभंग'नंतर 'धावपट्टी'वर उतरली रेणुका शहाणे, जाणून घ्या याबद्दल

By संजय घावरे | Published: May 17, 2024 5:27 PM

Renuka Shahane : 'गोविंदा नाम मेरा' चित्रपटानंतर इतर कामांमध्ये बिझी झालेली रेणुका शहाणे काही दिवसांपूर्वी मराठीच्या मुद्द्यावर व्यक्त झाल्याने पुन्हा लाईमलाईटमध्ये आली.

'गोविंदा नाम मेरा' चित्रपटानंतर इतर कामांमध्ये बिझी झालेली रेणुका शहाणे (Renuka Shahane) काही दिवसांपूर्वी मराठीच्या मुद्द्यावर व्यक्त झाल्याने पुन्हा लाईमलाईटमध्ये आली. रेणुकाच्या स्पष्टवक्तेपणाचं चाहत्यांकडून कौतुक होत असलेली रेणुका मात्र आपल्या आगामी प्रोजेक्टमध्ये बिझी आहे. याबाबत 'लोकमत'शी एक्सक्लुझीव्ह बातचित करताना रेणुका म्हणाली की, मी 'धावपट्टी' असं शीर्षक असलेला अ‍ॅनिमेशन लघुपट लिहिला असून, त्याची निर्मिती करत आहे. हा जरी अ‍ॅनिमेशनपट असला तरी मुलांसाठी नसून, प्रौढांसाठी आहे. या माध्यमातून वेगळा प्रयत्न केला आहे. याचं ८०% काम पूर्ण झालं आहे. 

अ‍ॅनिमेशनच्या कामासाठी जास्त वेळ लागत आहे. पुढील एक-दीड महिन्यात 'धावपट्टी' पूर्ण होईल. हि मुंबईकर गृहिणीची गोष्ट असली तरी पुरुषही 'धावपट्टी'शी जोडले जातील अशी आशा रेणुकाने व्यक्त केली. साडे सात मिनिटांची फिल्म टू-डी अॅनिमेशनमध्ये सादर करण्याचा विचार लेखन करतानाच मनात आल्याचंही रेणुका म्हणाली.

'धावपट्टी' यु ट्यूबवर रिलीज करेनमराठीमध्ये 'रीटा' चित्रपटाचं दिग्दर्शन केल्यानंतर रेणुकाने थेट 'त्रिभंग' चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. 'त्रिभंग' हा चित्रपट मूळात मराठीच होता असं सांगत रेणुका म्हणाली की, 'त्रिभंग'ला साजेसा निर्माता मिळाला नाही. नुकताच कोरोना गेल्याने 'त्रिभंग' मराठीत करण्याचं आव्हान कोणी स्वीकारलं नाही. काजोलने ठरवल्याने अजय देवगण यांनी निर्मितीसाठी पुढाकार घेतला आणि हिंदी-मराठीसह इंग्रजीतही 'त्रिभंग' रिलीज झाला. त्यामुळे आता अ‍ॅनिमेशनपट मराठीत बनवला आहे. आपल्याकडे अ‍ॅनिमेशनपट तसेच लघुपटांसाठी कोणतंही व्यासपीठ नसल्याने अगोदर महोत्सवांमध्ये पाठवेन. ओटीटीवर मराठी लघुपटच घेतले जात नसल्याने अ‍ॅनिमेशनपटांचा काय निभाव लागणार? त्यामुळे पुढे काय होईल माहित नाही. कुठेही प्लॅटफॉर्म मिळाला नाही तर 'धावपट्टी' यु ट्यूबवर रिलीज करेन असंही रेणुका म्हणाली.

टॅग्स :रेणुका शहाणे