बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्युनंतर अभिनेत्री कंगना राणौत सोशल मीडियावर अधिक सक्रीय झाली आहे. कंगना गेल्या काही दिवसांपासून ट्विटरच्या माध्यमातून नवनवीन खुलासे करताना दिसत आहे. मात्र, याचदरम्यान कंगनाने मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची (पीओके) उपमा दिल्यामुळे आता सोशल मीडियावर तिच्यावर टीकेचा भडिमार सुरु झाला आहे. रितेश देशमुख, केदार शिंदे, स्वप्नील जोशी, स्वरा भास्कर यांनी कंगनाच्या ट्विटला रोखठोक प्रत्युत्तर दिले आहे. अभिनेत्री रेणुका शहाणे ही सुद्धा कंगनावर भडकली आहे.
काय म्हणाली रेणुका?
प्रिय कंगना, मुंबई तेच शहर आहे, ज्या शहराने बॉलिवूड स्टार बनण्याचे तुझे स्वप्न पूर्ण केले. ज्या शहराने आपल्याला इतके काही दिले, त्याबद्दल खरे तर तुझ्या मनात थोडा तरी आदर असायला हवा. मात्र हे सोडून मुंबईची तुलना तू पीओकेशी कशी करू शकतेस? उचलली जीभ आणि लावली टाळ्याला... असे ट्विट रेणुका शहाणेने केले आहे.
केदार शिंदेचे ट्विट
दिग्दर्शक केदार शिंदे यांनी तर कंगनाला ‘कंगना व्हायरस’ म्हटले आहे. या मुंबईने कित्येक लोकांना डोक्यावर घेतले आणि कित्येकांना पायदळीही तुडवलं. जन्मभूमी कर्मभूमी आहे. ही़ आई आहे ही. खाऊन भरल्या ताटात... निषेध, असे ट्विट केदार शिंदे यांनी केले आहे.
स्वप्नील जोशीचे ट्विट
मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशी यानेही कंगनाला टोला लगावला आहे. आय लव्ह मुंबई, असे लिहत त्याने कंगनाच्या ट्विटला उत्तर दिले आहे.
काय म्हणाली कंगना?सुशांत सिंग राजपूत प्रकरणावर सतत मत मांडणा-या कंगनाने काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांची सुरक्षा घ्यायला नकार दिला होता. कंगनाने महाराष्ट्र पोलिसांबद्दल केलेल्या टीकेवरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी कंगनाला सुनावले होते. त्यानंतर कंगनाने एक ट्विट केले आहे. ‘शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला धमकी दिली आणि पुन्हा मुंबईत परतू नये असे म्हटले. यापूर्वी मुंबईच्या रस्त्यांवर स्वातंत्र्याच्या घोषणा देण्यात आल्या. आता उघडपणे धमक्या मिळत आहेत. ही मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे?’, असे कंगनाने म्हटले आहे.