ट्रिपल तलाकचा मुद्दा सध्या संसदेत चांगलाच गाजत आहे. यामधून मुस्लिम महिलांची सुटका व्हावी यासाठी मोदी सरकार प्रयत्न करत आहोत. पण अद्याप तरी यातून महिलांची सुटका झालेली नाहीये असेच म्हणावे लागेल. कारण एका अभिनेत्रीला तिच्या पतीने चक्क स्टॅम्प पेपरवर लिहून तलाकनामा पाठवला आहे. तिने पतीच्या विरोधात तक्रार दाखल केली असून या प्रकरणाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
भोजपुरी अभिनेत्री रेशमा शेख उर्फ अलीनाला तिच्या पतीने १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर तलाकनामा पाठवल्याची तक्रार तिने पोलिसांकडे दाखल केली आहे. हा तलाक एकतर्फी असल्याचे या अभिनेत्रीचे म्हणणे आहे. ही अभिनेत्री मध्यप्रदेशमधील इंदौर येथे राहात असून तिने तिचे पती मुद्दसिर बैग विरोधात तक्रार दाखल केली आहे.
तिने तक्रारीत म्हटले आहे की, १७ जुलैला माझ्या पतीने मला १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून तलाकनामा पाठवला आहे. मी या विरोधात पोलिसांकडे तक्रार नोंदवली असून मी या घटस्फोटाला मान्यता देत नाही. पोलिसांनी सांगितले आहे की, काऊन्सिलिंग करण्याआधी ते एफआरआय दाखल करू शकत नाहीत. या स्टॅम्प पेपरवर तलाक-ए-बाईन देत लग्नाच्या बंधनातून सुटका केली असल्याचे नमूद केले आहे. पण ही गोष्ट मी मान्य करत नसल्याने मी त्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
रेशमा शेख उर्फ अलीनाने भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले असून तिने २०१६ मध्ये मुदस्सिरसोबत लग्न केले होते. त्यांचा हा प्रेमविवाह असून त्यांना दोन महिन्यांचा मुलगा देखील आहे. अलीनाने लग्नानंतर अभिनयक्षेत्राला रामराम ठोकला आहे. पण आता तिच्या आयुष्यात घडलेल्या या घटनेचा तिला चांगलाच धक्का बसला आहे.