Join us

ड्रग्स केसमध्ये रिया आणि शौविकला किती वर्षांची शिक्षा होऊ शकते? NCB ने केला खुलासा...

By अमित इंगोले | Published: October 01, 2020 12:01 PM

एनसीबीने सांगितले की, रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक याला ड्रग्स प्रकरणात १० ते २० वर्षांची शिक्षा होऊ शकते.

बॉलिवूडमध्ये पसरलेल्या ड्रग्सच्या जाळ्याचा खोलवर तपास करत असलेल्या एनसीबीने बुधवारी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली एजन्सीने स्पष्ट केलं की, त्यांनी अभिनेत्रींना क्लीन चिट दिलेली नाहीये. त्यासोबत एनसीबीने सांगितले की, रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक याला ड्रग्स प्रकरणात १० ते २० वर्षांची शिक्षा होऊ शकते.

दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार, जेव्हा एनसीबी एजन्सीला विचारण्यात आले की, रियाचे वकिल सतीश मानेशिंदे यांचं म्हणणं आहे की, या प्रकरणाचा सुशांत सिंह केसशी काय संबंध आहे. याचा काय अर्थ आहे? यावर एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'ही चुकीची व्याख्या आहे. सुशांतच्या केसशी आमचं काही देणं-घेणं नाही. सुशांतची केस सीबीआय बघत आहे. आमचा तपास केवळ ड्रग कार्टेलशी संबंधित आहे'.

एका प्रश्नाचं उत्तर देताना एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या ड्रग कार्टेलमध्ये केवळ एकटा सुशांतच नाहीये. एजन्सीने आतापर्यंत १९ लोकांना अटक केली आहे. ही केस सुशांतला मुख्य आरोप बनवून चालवली जात नाहीये. हा एक मोठा ग्रुप आहे. अटक करण्यात आलेल्या लोकांना ड्रग जमा करणे, त्यासाठी पैसे देणे आणि आर्थिक मदत करण्याचे आरोप लागले आहेत.

बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींना क्लीन चिट देण्याच्या रिपोर्टवर अधिकारी म्हणाले की, कुणालाही क्लीन चिट देण्यात आलेली नाही. ती केवळ अफवा आहे. या बातम्या सत्य नाहीत. आमचा तपास सुरू आहे. जसजसे पुरावे मिळतील, आम्ही ते पुढे पाठवत जाऊ.

तपासादरम्यान सापडलेल्या गांजा आणि चरसच्या प्रमाणाबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, आतापर्यंत या तपासात कमर्शिअल प्रमाणात चरस आणि गांजा मिळाला आहे. आतापर्यंत आम्हाला १.४ किलो चरस आणि मोठ्या प्रमाणात गांजा मिळाला आहे. हा एक सुनियोजित गुन्हा आहे. यात रिया आणि शौविकला १० ते २० वर्षांची शिक्षा मिळू शकते. 

टॅग्स :नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोरिया चक्रवर्तीअमली पदार्थबॉलिवूडसुशांत सिंग रजपूत