सुशांत सिंह राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्तीला क्लीन चिट मिळाली. आता रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी एएनआयशी बोलताना या सगळ्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे आणि अनेक गुपितंही उघड केली आहेत. अभिनेत्री सुशांतच्या मृत्यूपूर्वीच त्याचं घर सोडून तिथून निघून गेली होती असं म्हटलं आहे.
"मी पहिल्या दिवसापासून सांगत आलो आहे की, रियाचा सुशांतच्या मृत्यूशी काहीही संबंध नाही. तरीही २७ जुलै २०२० रोजी तिच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली, त्यानंतर चौकशी सुरू झाली. त्यानंतर आम्ही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. १४ जून रोजी त्याचं निधन झालं आणि महाराष्ट्र पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली."
"रिया ८ जून रोजी सुशांतच्या घरातून निघून गेली"
"मुंबई पोलिसांच्या डीसीपी, वांद्रे झोन यांनी सखोल चौकशी केल्यानंतर असा निष्कर्ष काढला की, रिया चक्रवर्तीचा याच्याशी काहीही संबंध नाही. रियाचे जबाबही घेण्यात आले होते. रिया ८ जून रोजी सुशांतच्या घरातून निघून गेली, कारण त्या दिवशी रियाने सुशांतला ड्रग्ज घेताना आणि औषधं घेताना पाहिलं होतं, ज्यामुळे तिचे सुशांतशी भांडण झालं होतं. त्यानंतर सुशांतने अभिनेत्रीच्या भावाला त्याच्या बहिणीला घेऊन जाण्यास सांगितलं."
“सुशांतच्या कुटुंबाने रियाला या प्रकरणात ओढलं”
"रिया आणि सुशांतमध्ये त्या दिवसापासून कोणताही संपर्क झाला नाही. त्यानंतर सुशांतने आत्महत्या केल्याचं उघड झालं आणि त्यावेळी त्याच्या घरात २-३ नोकर आणि फ्लॅटमेट होते. सुशांतच्या कुटुंबाने रियाला या प्रकरणात ओढलं आणि पाटणा येथे खटला दाखल केला आणि म्हटलं की रिया चक्रवर्तीने त्यांच्या १५ कोटी रुपयांच्या मालमत्तेचा गैरवापर केला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग केलं. हे आत्महत्येचं स्पष्ट प्रकरण होतं" असं सतीश मानेशिंदे यांनी म्हटलं आहे.