अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) २०२० मध्ये सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी अडचणीत आली होती. तिने सुशांतला ड्रग्स देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असा आरोप झाला. काही महिने रिया तुरुंगातही होती. सीबीआय, एनसीबी कार्यालयात सततची चौकशी आणि बाहेर असणाऱ्या मीडियामुळे तिचे खूप हाल झाले होते. आपण जेलमध्ये असताना आईवडील बाहेर माझ्या मित्रांसोबत ड्रिंक्स घ्यायचे असा खुलासा तिने नुकताच केला.
एका मुलाखतीत रियाला प्रश्न विचारण्यात आला की ती तुरुंगात असताना बाहेर आईवडिलांनी याचा सामना कसा केला? यावर रिया म्हणाली, "मी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर जेव्हा आईवडील आणि मित्रांना पाहिलं तेव्हा त्यांचं वजन वाढलं होतं. हे पाहून मला धक्काच बसला. मला तर वाटलं होतं की माझ्या नसण्याने हे लोक खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करतील. पण मी परत आल्यानंतर मला भलतंच दिसलं."
ती पुढे म्हणाली, "खरंतर मी आणि शोविक तुरुंगात असताना मित्रमंडळींनीच आमच्या आईवडिलांची काळजी घेतली. या परिस्थितीत त्यांना जरा बरं वाटावं आणि वातावरण थोडं हलकं व्हावं म्हणून ते कधीकधी वाईनही आणायचे. ते घरी येऊन आईवडिलांसोबतच रात्रीचं जेवण करायचे. मी बाहेर आल्यावर त्यांना म्हटलं, "कमिनो, मी तिथे जेलमध्ये होते आणि तुम्ही मस्त खात होता?" तर ते म्हणाले की, नाही आम्ही फक्त काका-काकूंना चांगलं वाटावं म्हणून करत होतो. मी म्हटलं, "वाह!"
रिया चक्रवर्तीच्या त्या कठीण काळात तिचा मित्रपरिवारच आधार बनला होता. ते तिच्यासोबत खंबीरपणे उभे होते विशेषत: शिबानी अख्तर. रिया म्हणाली की संपूर्ण जग माझ्याविरोधात असताना फक्त शिबानीच माझ्यासोबत कायम होती.