देशात कोरोनाची दुसरी लाट असताना अनेक ठिकाणी लोकांची गर्दी आणि मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन होताना दिसतेय. हरिद्वारमध्ये सुरु असलेल्या महाकुंभ मेळ्यात कोरोना नियमांच्या पार चिंधड्या उडाल्याचे पाहायला मिळतेय. शाही स्नानाच्या एक दिवस आधीच उत्तराखंडमधून कोरोना रुग्णांचे भीतीदायक आकडे समोर येऊ लागले आहेत. गेल्या 24 तासांत 1,333 नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत. तर 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर देहरादूनमध्ये 582, हरिद्वारमध्ये 386, नैनीताल येथे 122 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. तर हर की पौडी येथे रविवारी 9 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अशात काही लोकांचा संताप अनावर होणारच. बॉलिवूडची अभिनेत्री रिचा चड्ढा (Richa Chadha) यापैकीच एक. कुंभमेळ्यातील (Kumbh Mela 2021 ) लाखोंची गर्दी पाहून रिचाचा राग अनावर झाला आणि सोशल मीडियावर तिने याबद्दलचा संताप बोलून दाखवला.कुंभमेळ्यातील लाखोंच्या गर्दीचा एक व्हिडीओ रिपोस्ट करत, ‘सुपर स्प्रेडर इव्हेंट’ असे रिचाने लिहिले.
रिचाने कुंभमेळ्याला ‘सुपर स्प्रेडर इव्हेंट’ म्हणणे अनेकांना रूचले नाही. अनेकांनी यावरून रिचाला ट्रोलही केले. ‘तबलिगी जमातच्या वेळेस तू गप्प का राहिलीस?,’ असा सवाल एका युजरने केला.
तर अन्य एकाने ‘रमजानच्यावेळीही तू असेच ट्विट करायला हवे होते,’ असे लिहित रिचाला सुनावले. अर्थात अनेकांनी रिचाच्या या ट्विटला पाठींबाही दिला.
रिचाने 2008 मध्ये ओय लकी, लकी ओय या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिच्या पहिल्याच चित्रपटातील भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. यानंतर गँग्स आॅफ वास्सेपूर, फुकरे, सरबजीत, फुकरे रिटर्न्स, मसान यांसारख्या चित्रपटांमध्ये ती झळकली़ गँग्स आॅफ वास्सेपूर, फुकरे, मसान यांसारख्या तिच्या चित्रपटांतील भूमिकांना पुरस्कार देखील मिळाले आहेत. आज बॉलिवूडमध्ये तिने तिच्या अभिनयाने तिचे एक स्थान निर्माण केले आहे.