कोणत्याही कलाकाराला काम मिळवणं, त्या मिळालेल्या संधीचे सोनं करणं आणि यश प्राप्त करणं ही काही सोपी बाब नाही. जे कलाकार हे करू शकतात ते अगदी सुपरस्टारपद मिळवतात. मात्र ज्यांना हे जमत नाही त्यांच्यावर अभिनय कारकिर्द सोडण्याची वेळ येते. अभिनयाचे क्षेत्र सोडाव्या लागलेल्या कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेत्री रिमी सेन. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मोठ्या मेहनतीने मॉडेलिंग तसेच व्यावसायिक जाहिरातीत रिमीने आपले स्थान निर्माण केलं. याच मेहनतीमुळे तिला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. हंगामा हा तिचा पहिला चित्रपट.
अक्षय खन्ना, आफताब आणि रिमी यांची प्रमुख भूमिका असलेल्या या विनोदी चित्रपटाने चांगलं यश मिळवलं. यानंतर 'दिवाने हुए पागल', 'क्युंकी', 'गरम मसाला', 'धूम', 'फिर हेरा फेरी', 'गोलमाल' अनलिमिटेड या चित्रपटातही तिने लहानमोठ्या भूमिका साकारल्या. यापैकी बहुतांशी भूमिका बोल्ड होत्या.
मात्र पुढच्या काळात रिमीला एकाच प्रकारच्या, एकाच धाटणीच्या भूमिका मिळू लागल्या. त्यामुळे एकाच पठडीतील भूमिका साकारल्याने रिमी कंटाळली. त्यामुळे अशाप्रकारच्या भूमिका न साकारण्याचा निर्णय तिने घेतला. हाच निर्णय तिला भारी पडला आणि रिमीच्या अभिनय कारकिर्दीला पूर्णविराम लागल.
यानंतर तिने निर्मिती क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस तिने स्थापन केलं. २०१५ साली रिमीची निर्मिती असलेल्या 'बुधिया सिंह- बॉर्न टू लर्न' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. मात्र एक अभिनेत्री म्हणून जीवनातला एक निर्णय चुकला आणि करिअर संपुष्टात आले अशी कबुली रिमीने एका मुलाखतीत दिली आहे.