बॉलिवूडला रिमी सेन (Rimi Sen) हे नाव नवीन नाही. एकेकाळी रिमीने इंडस्ट्रीत बरीच लोकप्रियता मिळवली होती. तिचा चाहतावर्गदेखील अफाट होता. परंतु, एका ठराविक काळानंतर तिच्या लोकप्रियतेला आणि करिअरला उतरती कळा लागली. गेल्या कित्येक वर्षांपासून रिमीचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. 2003 मध्ये 'हंगामा' या सिनेमातून इंडस्ट्रीत पदार्पण करणारी रिमी मध्यंतरी 'बिग बॉस 9' मध्ये दिसली होती. परंतु, त्यानंतर पुन्हा ती इंडस्ट्रीतून गायब झाली. विशेष म्हणजे तिचं करिअर अपयशी ठरण्यामागे तिने स्वत:ला दोष दिला आहे.
रिमीने सलमान खानसोबत 'क्योंकि' या सिनेमातही काम केलं होतं. या सिनेमानंतर तिने लागोपाठ अनेक सुपरहिट सिनेमा इंडस्ट्रीला दिले. परंतु, त्यानंतर तिचा कलाविश्वातील वावर कमी झाला. अलिकडेच रिमीने 'नवभारत टाइम्स ऑनलाइन'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या करिअरच्या अपयशाचं कारण सांगितलं.
मला कोणावर ओझ व्हायचं नाही
'क्योंकि' सिनेमानंतर रिमीने 'बिग बॉस'च्या निमित्ताने पुन्हा एकदा सलमानसोबत काम केलं. त्यामुळे तिच्या बुडत्या करिअरसाठी तिने भाईजानची मदत का घेतली नाही? असा प्रश्न तिला विचारण्यात आला. त्यावर, सलमान खरंच खूप चांगला आणि मदत करण्यास कायम तत्पर असलेला अभिनेता आहे. पण, मी कधीच त्यांच्याकडे काम मागितलं नाही. जेव्हा इंडस्ट्रीत एखाद्याकडे काम नसतं त्यावेळी तो सलमानकडेच मदत मागायला जातो. ते मदत सुद्धा करतात. पण, मला कोणावर ओझ व्हायचं नाहीये. माझ्या नशिबात असेल तर मला नक्की काम मिळेल.
मीच माझं करिअर संपवलं
"मी जेव्हा कोलकात्तावरुन मुंबईला आले होते त्यावेळी माझ्याकडे काहीच नव्हतं. पण, देवाने मला हवं ते सगळं दिलं ना? त्यामुळे माझ्या नशिबात असेल तर मला काम मिळेल. त्यांच्याकडे (सलमान खान) पॉवर आहे म्हणून लोक त्यांच्याकडे जातात. पण, माझ्या चुकीमुळे जे झालंय त्यासाठी ते कसं काय मला मदत करतील?त्यावेळी मला माझं पीआर करायला पाहिजे होतं. मी स्वत: माझ्या हाताने माझं करिअर संपवलं आहे. जर तुम्हाला तुमचं टॅलेंट लोकांना दाखवता येत नसेव तर तुमचं लाइफमध्ये काहीही होऊ शकत नाही. मग तुम्ही कोणत्याही फिल्डमध्ये का असेनात."
दरम्यान, रिमी सेनने तिच्या करिअरमध्ये 'हंगामा', 'बागबान', 'धूम', 'क्योंकि', 'गरम मसाला', 'फिर हेरा फेरी', 'दीवाने हुए पागल', 'गोलमाल: फन अनलिमिटेड', 'धूम 2' आणि 'जॉनी गद्दार' यांसारखे अनेक सुपरहिट सिनेमा दिले. परंतु, २०११ नंतर ती इंडस्ट्रीतून अचानक गायब झाली.