ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांच्या निधनानंतर बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. चाहतेही शोकसागरात बुडाले आहे. दिलीप कुमार यांच्या निधनानंतर बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी, राजकीय मंडळी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांच्या घरी पोहोचले. या गर्दीत एका चेह-याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अंगावर काळा बुरखा, हातात हिरव्या रंगाची माळ, तोंडावर मास्क आणि डोळ्यांत अश्रू असलेली ही महिला गर्दीत विलाप करताना दिसली. मी दिलीप कुमार यांची नातेवाईक असल्याचे सांगून ती जोरजोरात आक्रोश करत होती. काही जण तिला सांत्वना देत होते. अगदी पोलिसांनीही तिला सांत्वना दिली. पण ही महिला कोण? याचा शेवटपर्यंत थांगपत्ता लागला नाही.
दिलीप कुमार यांच्या कुटुंबीयांनी आम्ही या महिलेला ओळखत नसल्याचे सांगितले आणि तिला दिलीप कुमारांचे अंत्यदर्शन घेण्यापासून रोखण्यात आले. ती बराच वेळ दिलीप कुमारांच्या घराबाहेर रडत बसून राहिली. यादरम्यान तिचा व्हिडीओही व्हायरल झाला. पण कोव्हिड नियम आणि कुटुंबाने ओळखण्यास नकार दिल्यानंतर पोलिसांनी तिला तिथून जायला सांगितले.दिलीप कुमारांसाठी अश्रू ढाळणारी ही महिला कोण होती? दिलीप कुमारांशी हिचे काय नाते होते? हे अद्यापही गुलदस्त्यात होते. अनेकांच्या मते, ती दिलीप कुमार यांची चाहती असावी.
(साभार)
सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी याने या महिलेचा व्हिडीओ त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केला आहे. तूर्तास या व्हिडीओवर लोक वेगवेगळ्या कमेंट्स करताना दिसत आहेत. बिचारी, दिलीप कुमारांची मोठी चाहती असावी. अंत्यदर्शन घेऊ द्यायचे होते..., खूप अपमानास्पद तिला अंत्यदर्शन घेऊ दिले असते तर काय बिघडले असते, अशा कमेंट्स लोकांनी केल्या आहेत.