अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट यांच्यातील जवळीक वाढत असून त्यांचे चाहते त्यांच्या नात्याबद्दल जाणून घेण्यास फार उत्सुक आहेत. रणबीर व आलिया यांनी त्यांच्या नात्याबद्दल चुप्पी साधली आहे. मात्र रणबीर कपूरचे वडील ऋषी कपूर यांनी नुकतेच रणबीरच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे. ते म्हणाले की, रणबीरला आलिया खूप आवडते. फक्त रणबीरलाच नाही तर मला आणि त्याची आई नीतू कपूरलाही आलिया खूप आवडते. त्याला आवडेल त्या मुलीशी तो लग्न करु शकतो, त्यासाठी त्यांच्यावर कुठलेही बंधन नाही.
मुंबई मिररला दिलेल्या एका मुलाखतीत ऋषी कपूर म्हणाले, रणबीरला स्वत:चे आयुष्य आहे. त्याला त्याचा जीवनसाथी निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्याला आवडणाऱ्या मुलीसोबत लग्न करण्याचे त्याला पूर्ण स्वातंत्र्य असून नीतूला आलिया आवडते, मलासुध्दा आवडते. आमच्या घरातसुद्धा प्रत्येकाने मनपसंत जोडीदार निवडला आहे. त्यामुळे रणबीरलासुद्धा तो हक्क आहे.अनेकदा रणबीर कपूर आणि आलिया भटला एकत्र पाहिले आहे. सोनम कपूरच्या लग्नालासुद्धा दोघे एकत्र हजर होते. सोशल मीडियापासून तर त्याचे नाते कधीच लपून राहिलेले नाही. दोघांचे एकमेकांसोबतचे फोटो नेहमीच पाहायला मिळतात. महत्त्वाचे म्हणजे आलियाच्या फोटोंवर नीतू कपूर नेहमीच पसंती आणि दाद देताना दिसतात.
अयान मुखर्जीचा आगामी सिनेमा ब्रम्हास्त्र सिनेमात रणबीर आणि आलिया एकत्र झळकणार आहेत. या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाल्यापासूनच त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले आहे. या सिनेमात या दोघांसोबतच अमिताभ बच्चनसुद्धा झळकणार आहेत. आता आलिया व रणबीर त्यांच्या नात्याबद्दल खुलासा कधी करतील, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.