काल रात्री उशिरा अचानक तब्येत बिघडल्याने ऋषी कपूर यांना तातडीने मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथेच त्यांनी अंतिम श्वास घेतला. इरफान पाठोपाठ ऋषी कपूर यांच्या निधनाने बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे.
1975 मध्ये नीतू यांनी ऋषी कपूर यांच्यासह ‘खेल खेल में’ हा सिनेमा केला आणि एकत्र काम करता करता ते एकमेकांच्या प्रेमात पडले. या लोकप्रिय जोडीने 11 सिनेमांत एकत्र काम केले. खऱ्या आयुष्यात पती-पत्नी म्हणून वावरताना नीतू यांनी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ऋषी यांना सोबत केली.
ऋषी कपूर आणि नीतू कपूर या जोडीचा पहिला सिनेमा ‘जहरीला इन्सान’ होता. पण हा चित्रपट दणकून आपटला. नीतू अगदी 14 वर्षांच्या असताना त्यांनी ऋषी कपूर यांना डेट करण्यास सुरुवात केली. सिनेमाच्या सेटवर ऋषी कपूर नीतू यांना सतत छेडत असायचे. त्यांची ही सवय नीतूला इरिटेट करत असे. मात्र हळूहळू हाच राग प्रेमात रुपांतरीत झाला. ‘खेल खेल में’ सिनेमानंतर ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांच्या रोमान्सची चर्चा रंगली. अफेअरच्या काहीच वर्षांनंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
आपल्या लग्नात ऋषी कपूर आणि नीतू सिंग दोघेही बेशुद्ध पडले होते. अर्थात वेगवेगळ्या कारणांनी. नीतू यांचा लेहंगा इतका जड होता की, तो त्या सांभाळू शकल्या नाहीत आणि त्या बेशुद्ध पडल्या. तर ऋषी कपूर हे आजूबाजूच्या गर्दीमुळे भोवळ येऊन खाली पडले. दोघेही शुद्धीवर आल्यानंतरच त्यांचे लग्न झाले होते.
नीतू यांनी एका मुलाखतीत ऋषी कपूर यांच्या अफेअरबद्दल सांगितले होते. त्यांनी म्हटले होते की, ‘आम्ही एकमेकांना डेट करत असतानाही ऋषी कपूर एका दुसऱ्या अभिनेत्रीसोबत फ्लर्ट करत होते. आमचे अफेअर सुरू नसल्याचे ते तिला दाखवत होते. त्यावर त्यांना मी विचारले असता असे काहीही नसल्याचे त्यांनी मला सांगितले होते.