Join us

पाकिस्तानात ‘मुल्क’वर बंदी! दिग्दर्शक अनुभव सिन्हा म्हणाले, वैध नाही तर अवैधमार्गाने पाहा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2018 8:43 AM

अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘मुल्क’ या चित्रपटावर पाकिस्तानी सेन्सॉरने बंदी घातली आहे. ‘मुल्क’ आज रिलीज होतोय. यानंतर दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी पाकिस्तानींना उद्देशून एक संदेश सोशल मीडियावर लिहिला आहे. 

अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘मुल्क’ या चित्रपटावर पाकिस्तानी सेन्सॉरने बंदी घातली आहे. ‘मुल्क’ आज रिलीज होतोय. यानंतर दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी पाकिस्तानींना उद्देशून एक संदेश सोशल मीडियावर लिहिला आहे. ‘पाकिस्तानच्या प्रिय नागरिकांनो, मी ‘मुल्क’ नावाचा चित्रपट बनवला. ज्यावर तुमच्या देशात कायदेशीररित्या बंदी लादण्यात आली आहे, त्यामुळे तुम्ही माझा हा चित्रपट बघू शकत नाही. मला आठवते की, या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला होता तेव्हा, याविरोधात भारत व पाकिस्तानातील अनेक लोकांनी लिहिले होते. मला ठाऊक आहे की, हा चित्रपट आज ना उद्या तुम्ही पाहणारचं. कृपया चित्रपट पाहा आणि पाकिस्तानच्या सेन्सॉर बोर्डाने यावर बंदी का घातली,यावर बोला. हा चित्रपट तुम्ही सर्वांनी वैधरित्या बघावा, अशी माझी इच्छा आहे. पण गरज भासलीस तर बेकायदेशीरपणेही तो बघा. अर्थात आमची टीम पायरेसी रोखण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहे,’ असे आवाहन अनुभव सिन्हांनी केले.याआधीही ब-्याच हिंदी चित्रपटांच्या प्रदर्शनावर पाकिस्तानने बंदी घातलेली आहे.

अलीकडे प्रदर्शित झालेला करीना कपूरची प्रमुख भूमिका असलेला ‘वीरे दि वेडिंग’द फेडरल सेन्सॉर बोर्ड आॅफ पाकिस्तानच्या सदस्यांना अश्लील व असभ्य वाटला होता. त्यामुळे त्यांनी प्रदर्शनावर बंदी घातली होती. अक्षय कुमारच्या ‘पॅडमॅन’ हा चित्रपट खुलेआमपणे स्त्रियांच्या मासिक पाळीबद्दल बोलत होता म्हणून या चित्रपटावरही पाकिस्तानने बंदी घालली होती. हल्लीच प्रदर्शित होऊन गेलेला मेघना गुलझार दिग्दर्शित ‘राझी’ हा चित्रपटही भारत-पाकिस्तान लष्करी पार्श्वभूमीवर बेतलेला असल्याचा कांगावा करत, पाकिस्तानने बॅन केला होता. त्याचप्रमाणे शाहरुख खानचा ‘रईस’, ‘जब तक हैं जान’, ‘चेन्नई एक्सप्रेस’, सलमान खानचा ‘एक था टायगर’ या चित्रपटांच्या प्रदर्शनावरही पाकिस्तानात बंदी घालण्यात आली होती.