काल रात्री उशिरा अचानक तब्येत बिघडल्याने ऋषी कपूर यांना तातडीने मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथेच त्यांनी अंतिम श्वास घेतला. इरफान पाठोपाठ ऋषी कपूर यांच्या निधनाने बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे.
मुंबईतील मरिन लाईन्स परिसरातील चंदन स्मशानभूमीत ऋषी कपूर यांच्या पार्थिवावर नुकतेच अंत्यसंस्कार करण्यात आले.
आदर जैन, अभिषेक बच्चन, अनिल अंबानी, रणधीर कपूर, करिना कपूर, सैफ अली खान,करिश्मा कपूर, अरमान जैन, आलिया भट्ट, राजीव कपूर, शशी कपूर यांची मुले यांसारखे जवळचे नातेवाईक आणि काही मित्रमंडळीच स्मशानभूमीत उपस्थित होते. अंत्यविधीच्यावेळी नीतू कपूर पूर्णपणे खचल्या होत्या, त्यांना सांभाळणे उपस्थितांना कठीण झाले होते.
भारतात लॉकडाऊन असल्याने केवळ 20-25 लोकांच्या उपस्थितीत ऋषी कपूर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांचे पार्थिव घरी न नेता थेट रुग्णालयात नेण्यात आले होते.
ऋषी कपूर गेल्या वर्षभरापासून कर्करोगाशी लढत होते. काल रात्री उशिरा त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांची त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केलेत. पण हे सगळे प्रयत्न निष्फळ ठरलेत. 2018 मध्ये ऋषी कपूर कॅन्सरवरील उपचारासाठी अमेरिकेला गेले होते. तेथे 11 महिने उपचार घेतल्यानंतर ते भारतात परतले होते.