राज कपूर यांच्या पत्नी आणि ऋषी कपूर यांच्या आई कृष्णा राज कपूर यांचे गतवर्षी 1 ऑक्टोबरला निधन झाले. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. कृष्णा यांच्या निधनावेळी अख्खे कपूर कुटुंबीय मुंबईत होते. पण कृष्णा यांचा मुलगा ऋषी कपूर, सून नीतू कपूर आणि नातू रणबीर कपूर हे मात्र त्यावेळी न्यूयॉर्कमध्ये होते. ऋषी कपूर आईचे अखेरचे दर्शनही घेऊ शकले नाहीत. आईच्या अंत्यसंस्कारालाही ते येऊ शकले नाहीत. कारण यावेळी त्यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरचे उपचार सुरु होते. ऋषी कपूर पहिल्यांदा याबद्दल बोलले.
मिड डेला दिलेल्या मुलाखतीत, आईबद्दल बोलताना ते भावूक झालेत. आईच्या निधनाची बातमी मिळाली तेव्हा मी स्वत:ला कसे सांभाळले, हे माझे मलाच माहित. मी 29 सप्टेंबरला उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना झालो होतो आणि 1 ऑक्टोबरला माझ्या आईचे निधन झाले. मला गंभीर आजार आहे, हे आईला ठाऊक होते. तो काळ आमच्यासाठी कसोटीचा काळ होता.
आई गेल्याची बातमी मिळाली तेव्हा माझे उपचार सुरु होते. मी काय करू, हेच मला कळत नव्हते. जमल्यास आईच्या भेटीला ये, असे माझ्या भावाने मला सांगितले होते. पण खूप उशीर झाला होता.
मी आईच्या भेटीला जाईल, इतकी शक्ती माझ्यात उरली नव्हती. तिच्या अंत्यदर्शनालाही मी मुंबईत जाऊ शकलो नाही. माझ्यात त्यासाठी ऊर्जाच शिल्लक नव्हती, असे ऋषी कपूर यावेळी म्हणाले. हे सांगताना ते प्रचंड भावूक झालेत.ऋषी कपूर गेल्या अनेक महिन्यांपासून न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेत आहेत. त्यांच्या पत्नी नीतू सिंगही त्यांच्यासोबत आहेत.