बॉलिवूड अभिनेता नाना पाटेकर सध्या त्यांच्या द व्हॅक्सिन वॉर या सिनेमामुळे चर्चेत येत आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने ते त्यांच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफविषयी अनेक गोष्टींचा खुलासा करत आहेत. यामध्येच त्यांनी दिवंगत अभिनेता ऋषी कपूर (rishi kapoor) यांच्याविषयी एक खुलासा केला. ऋषी कपूर आणि नाना पाटेकर एकमेकांचे मित्र होते. मात्र, तरीदेखील ऋषी यांनी नानांना 'तू अभिनय सोडून दे,' असा सल्ला दिला होता.
'द व्हॅक्सिन वॉर' या सिनेमाच्या निमित्ताने नाना पाटेकर यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी ऋषी कपूर यांचा एक किस्सा सांगितला. "ऋषी कपूर एक व्यक्ती म्हणून खूप छान आहेत. ते माझ्या घरीही यायचे. एकदा असेच ते दारुची बाटली घेऊन माझ्या घरी आले. आणि म्हणाले, मला खात्री आहे तुझ्याकडे दारुची बाटली नसेलच. ते आल्यावर मी त्यांना खीमा-रोटी खायला दिली", असं नाना पाटेकर म्हणाले.
पुढे ते म्हणतात, "जेवत असताना ऋषी कपूर मला म्हणाले, तू एक सर्व साधारण अभिनेता आहेस. पण, त्यापेक्षा उत्तम शेफ आहेस. त्यामुळे तू अॅक्टींग सोड. मी तुझ्यासाठी रेस्टॉरंट उघडतो. ऋषी कपूर यांना मी फार कमी वेळा भेटलो. मात्र, ते माझे खूप चांगले मित्र होते. मी आजही त्यांना मिस करतो."
दरम्यान, नाना पाटेकर सध्या त्यांच्या द व्हॅक्सिन वॉर या सिनेमामुळे चर्चेत येत आहेत. विवेक अग्निहोत्रींच्या या सिनेमात नाना पाटेकर यांच्यासोबत पल्लवी जोशी, गिरीजा ओक यांसारखे दिग्गज कलाकार झळकले आहेत.