काल बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता इरफान खान चाहत्यांना सोडून गेला आणि आज बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते व तुमचा आमचा ‘चिंटू’ अर्थात ऋषी कपूर यांनी जगाचा निरोप घेत सगळ्यांना मोठा धक्का दिला. काल रात्री उशिरा अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना तातडीने मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात भरती करण्यात आले होते. येथेच त्यांनी अंतिम श्वास घेतला. इरफान पाठोपाठ ऋषी कपूर यांच्या निधनाने बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. अख्खे बॉलिवूड शोकमग्न झाले आहे. चाहतेही शोकाकूल आहेत.
महानायक अमिताभ बच्चन यांनी ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी ट्विट केली. तो गेला...ऋषी कपूर गेलेत... मी तुटलोय... , असे ट्विट त्यांनी केले. कपूर कुटुंबातून अभिनेते रणधीर कपूर यांनी ऋषी कपूर यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
ऋषी कपूर गेल्या वर्षभरापासून कर्करोगाशी लढत होते. काल रात्री उशिरा त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांची त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केलेत. पण हे सगळे प्रयत्न निष्फळ ठरलेत. 2018 मध्ये ऋषी कपूर कॅन्सरवरील उपचारासाठी अमेरिकेला गेले होते. तेथे 11 महिने उपचार घेतल्यानंतर ते भारतात परतले होते.
बॉलिवूडला मोठा धक्का
कालच अभिनेता इरफान खानने जगाचा निरोप घेतला आणि पाठोपाठ ऋषी कपूर यांनीही जगाला अलविदा म्हटले. पाठोपाठ दोन दिग्गज अभिनेत्यांना बॉलिवूडने गमावले़ यामुळे बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर बॉलिवूडकरांनी ऋषी कपूर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.ऋषी कपूर यांनी बॉलिवूडला एकापेक्षा एक हिट सिनेमे दिलेत. पहिलाच सिनेमा ‘बॉबी’ सुपरडुपर हिट झाला आणि त्यानंतर अनेक वर्षे ऋषी कपूर यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले.१९७३ च्या बॉबी पासून २००० पर्यंत ऋषीकपूर हे नायकाची रोमांटिक भूमीका करीत होते. या दरम्यान त्यांनी ९२ चित्रपटात काम केले, त्यापैकी ५१ चित्रपटात ते सोलो हिरो होते तर ४१ मल्टिस्टारर सिनेमे होते. या दरम्यान त्यांनी जवळपास सर्वच अभिनेत्रीसोबत नायक म्हणून काम केले होते. २००० पर्यंत रोमांटिक भूमिका केल्यानंतर त्यांनी सहायक अभिनेता म्हणून भूमिका साकारायला सुरुवात केली तर त्याच्या अभिनयाचे वैविध्य दिसून आले. नमस्ते लंडन, औरंगझेब, हाउसफुल्ल 2, स्टूडेंट आॅफ द ईयर, अग्निपथ अशा व अशाच अनेक हिट सिनेमात त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या.