बॉलिवूडमधील सर्वात क्युट कपलपैकी एक कपल म्हणजे रितेश देशमुख (Ritiesh Deshmukh) आणि जिनिलिया डिसुझा-देशमुख (Genelia D'souza-Deshmukh). ते दोघेही कायम चाहत्यांना कपल गोल्स देत असतात. रितेश आणि जिनिलियाने २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली. दोघेही सोशल मीडियावरुन एकमेकांप्रतीचं प्रेम व्यक्त करताना दिसतात. रितेश-जिनिलिया ही जोडी एक आदर्श जोडी आहेच, पण यासोबत हे दोघे आदर्श पालक आहेत. त्यांना दोन मुलं आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या बॉंडिंगचे वेगवेगळे व्हिडीओ पाहायला मिळतात. आताही असाच एक व्हिडीओ समोर आला आहे.
रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांचा 'वेड' हा चित्रपट ३० डिसेंबर २०२२ रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला होता. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतलं होतं. या चित्रपटातील कलाकारांचा अभिनय चित्रपटाची कथा चित्रपटातील गाणी हे सर्वच प्रेक्षकांना आवडलं होतं. अनेकांनी या चित्रपटातील गाण्यांवर व्हिडीओ बनवले होते. चित्रपटाला दोन वर्ष उलटली असली तरी 'मला वेड लावलंय' या गाण्याची क्रेझ कमी झालेली नाही. 'मला वेड लावलंय' या गाण्यावर स्वत: रितेश देशमुखने मुलांसोबत डान्स केल्याचं पाहायला मिळालं आहे.
रितेश आणि मुलं रियान आणि राहील यांना डान्स करताना पाहून जिनिलियादेखील कौतुकानं भारावली. तिनं हा सुंदर क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. हा गोड व्हिडीओ 'madoholic' या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. रितेश देशमुखच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, सध्या तो 'राजा शिवाजी' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन रितेश स्वत: करतोय आणि या चित्रपटाची निर्मिती जिनिलिया देशमुख करत आहे. याशिवाय, रितेश 'हाऊसफुल ५'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तर जिनिलिया ही आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'मध्ये झळकणार आहे.