अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जेनेलिया देशमुखचा (Genelia Deshmukh) सध्या त्यांच्या आगामी ‘वेड’ (Ved ) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. हा सिनेमा रितेश व जेनेलियासाठी सर्वार्थाने खास आहे. याचं कारण म्हणजे, या चित्रपटाद्वारे रितेश दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करतोय आणि जेनेलिया या सिनेमाच्या माध्यमातून जेनेलिया मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवते आहे. नुकतंच या सिनेमातील ‘बेसुरी’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आणि या गाण्यानं चाहत्यांना जणू वेड लावलं.
‘वेड’ या सिनेमाचं पोस्टर, टीझर आणि टायटल सॉंग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. यानंतर ‘वेड’ सिनेमातील ‘बेसुरी’ हे गाणं रिलीज झालं आणि या सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ घातला. ‘बेसुरी’ या गाण्याच्या माध्यमातून रितेश आणि जेनेलियाने संगीतक्षेत्रात पदार्पण केलं आहे. त्यांनी ‘देश म्युझिक’ नावाने म्युझिक लेबल सुरू केलं आहे. या लेबल अंतर्गत त्यांचं हे पहिलं गाणं आहे.
गाण्यातील जेनेलियाचा क्यूट अंदाज बघून चाहते फिदा झाले आहेत. शाळकरी मुलीच्या पोशाखात ती कमालीची क्यूट दिसतेय. जेनेलिया दोन मुलांची आई आहे, यावर हे गाणं पाहून विश्वास बसत नाही. हे गाणं आणि या गाण्यातील क्यूट जेनेलियाचा अंदाज पाहून चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत. तुम्हा दोघांना एकत्र स्क्रिनवर पाहण्यासाठी किती दिवस वाट बघितली. तुम्ही एक आदर्श जोडपं आहात, अशा शब्दांत एका युजरने या गाण्यावर प्रतिक्रिया दिली आहे. लयभारी, भाऊ वहिनी जोरदार, कडक, एक नंबर अशा असंख्य कमेंट्स या गाण्यावर पाहायला मिळत आहेत.‘बेसुरी’ हे गाणं गीत वसुंधरा वी यांनी गायलंआहे. तर अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलं आहे. मुंबई फिल्म कंपनीने देश म्युझिक लेबलद्वारे हे गाणं रिलीज केलं आहे. ‘बेसुरी’ या रोमँटिक गाण्यात रितेश आणि जेनेलिया मुख्य भूमिकेत आहेत.
‘वेड’ या सिनेमात जेनेलिया आणि रितेशसह ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी तसेच अभिनेता शुभंकर तावडे आणि अभिनेत्री जिया शंकरदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा सिनेमा येत्या 30 डिसेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.