सध्या संपूर्ण महाराष्ट्रातलोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. आज महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडतंय. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मंगळवारी 10 राज्ये आणि 94 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. त्यानिमित्त अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा यांनी लातूर येथील मतदान केंद्राला भेट देऊन 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केले. रितेशची आई आणि विलासरावांची पत्नी सुद्धा यावेळी दिसू आल्या.
सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये रितेश आणि जिनिलिया मतदान करण्यासाठी मतदान केंद्रात जाताना दिसले. कोणतीही गडबड न करता देशमुख कुटुंब रांगेत उभे राहिले. याशिवाय शांतपणे एकएक करुन आत जात त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. रितेश - जिनिलियाने मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि सर्वांना मतदान करण्याचं आवाहन केलं.
मतदान केल्यानंतर जिनिलियाने मतदान केंद्राबाहेर ANI या वृत्तसंस्थेशी संवाद साधला. "मत देणं गरजेचं आहे", असं तिने सर्वांना सांगून मतदान करण्याचे आवाहन केले. यााशिवाय “हा एक महत्त्वाचा दिवस आहे. मतदान करणं महत्वाचं आहे. प्रत्येक नागरिकाने जाऊन मतदान करावे.” असंही ती म्हणाली. रितेश पुढे म्हणाला, “मी मतदान करण्यासाठी मुंबईहून लातूरला आलो आहे. प्रत्येकाने घराबाहेर पडून मतदान करावे. आजचा दिवस महत्त्वाचा आहे. प्रत्येकाने नक्कीच मतदान केले पाहिजे.” पुढे देशमुख कुटुंबाने विलासरावांच्या तसबिरीसमोर काढलेला फोटो चांगलाच व्हायरल झाला.