आपण एखादा चित्रपट पाहायला गेलो आणि तो चित्रपट आपल्याला आवडला नाही तर साहजिकच आपली पहिली प्रतिक्रिया असते की, उगाचच हा चित्रपट पाहायला आलो, माझे पैसेच वाया गेले. मला तर वाटते या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांकडून या तिकिटाचे पैसेच परत घेतले पाहिजे. आपण कितीही बोललो तरी आपल्याला काही तिकिटाचे पैसे परत मिळत नाहीत. पण रितेश देशमुखने चक्क एका व्यक्तीला पैसे परत केले आहेत. पण हे पैसे काही खरेखुरे नाहीत तर त्याने ट्विटरवर केवळ पैशांची नोट पोस्ट केली आहे.
रितेश देशमुख सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह असतो. तो त्याच्या कुटुंबियांचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच पोस्ट करत असतो. एवढेच नव्हे तर तो सामाजिक प्रश्नांविषयी देखील नेहमीच भाष्य करत असतो. त्यामुळे रितेशला सोशल मीडियावर त्याचे चाहते मोठ्या प्रमाणावर फॉलो करतात. तो देखील सोशल मीडियाद्वारे त्यांच्या संपर्कात असतो. आता तर रितेश देशमुखने सोशल मीडियाद्वारे एका व्यक्तीला एक मजेशीर रिप्लाय दिला आहे. त्याच्या या रिप्लायची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. एका व्यक्तीने ट्विटरला रितेश देशमुखला टॅग करत एक ट्वीट केले होते. त्याने ट्वीटमध्ये लिहिले होते की, मी बँगिस्तान हा चित्रपट पाहिला होता आणि आता मला माझे पैसे परत हवे आहेत.
रितेशने हे ट्वीट वाचल्यानंतर काहीच मिनिटांत त्या व्यक्तीला रिप्लाय केला आणि चक्क ट्वीटद्वारे त्याचे पैसे परत केले. त्याने एक हजारच्या नोटेचा फोटो पोस्ट करत त्याला मजेशीर रिप्लाय दिला आहे. त्याने त्यासोबत लिहिले आहे. यात समोसाचे पैसे देखील अॅडजस्ट करून घे आणि विशेष म्हणजे त्याने त्यासोबत ही नोट 2015 मध्ये वापरात होती असे लिहिले आहे.
बँगिस्तान हा चित्रपट 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात रितेशसोबतच पुल्कीत सम्राट, जॅकलिन फर्नांडिस, आर्या बब्बर यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटाचे निर्माते रितेश सिडवानी आणि फरहान अख्तर होते तर दिग्दर्शन करण अंशूमन यांनी केले होते.