अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh), अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि अभिनेता साकिब सलीम (Sakib Salim) अभिनीत हॉरर कॉमेडी 'ककुदा' (Kakuda Movie) नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार(Aditya Sarpotdar)ने केले आहे. या चित्रपटाची कथा उत्तर प्रदेशमधील मथुरा जिल्ह्यातील रतोडी गावावर आधारीत आहे. या चित्रपटात रितेश देशमुख वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. त्याने घोस्ट हंटर व्हिक्टर जेकब्सची भूमिका साकारली आहे.
आजवर नेहमीच विविधांगी भूमिका साकारत रसिकांना 'वेड' लावणारा रितेश देशमुख आजवर कधीही न पाहिलेल्या रूपात प्रेक्षकांसमोर आला आहे. १०० कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवणाऱ्या 'मुंजा'चा दिग्दर्शक आदित्य सरपोतदारचा 'ककुदा' हा आणखी एक हॉरर-कॅामेडीपट डिजिटली रिलीज झाला आहे. २०१८मध्ये 'माऊली' चित्रपटासाठी पहिल्यांदा एकत्र आलेल्या आदित्य आणि रितेश यांचं 'ककुदा'मुळे रियुनियन झालं आहे. यात रितेशने घोस्ट हंटर व्हिक्टर जेकब्सची भूमिका साकारली आहे. हा स्वत:ला तांत्रिक नव्हे, तर घोस्ट हंटर म्हणतो. 'डोन्ट फिअर व्हेन व्हिक्टर इज हिअर', असं म्हणत त्याने १२७ चेटकिणी, ७२ पिशाच्च आणि ४७ भूतांना पळवून लावलेलं आहे. आत्म्यांशी संवाद साधणारा हा तांत्रिक आजच्या काळातील असल्याने त्याचा लुक मॅाडर्न असून, त्याच्याकडे आधुनिक यंत्रंही आहेत. भूतांना जे सांगायचं ते व्हिक्टर कागदावर उतरवून त्यांना मुक्ती देतो.