Ritesh Deshmukh: 'महाराष्ट्र नवनिर्माण सेने'चे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पुढाकाराने काल मनसेचा 'मराठी भाषा गौरव दिन' (Marathi Bhasha Gaurav Din 2025) पार पडला. 'मराठी भाषा गौरव दिना'निमित्त शिवाजी पार्कला मान्यवरांनी हजेरी लावत कविता वाचनाचा एक आगळावेगळा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात अभिनेता रितेश देशमुखही सहभागी झाला होता. पण, यावेळी त्यानं सगळ्यांसमोर हात जोडून माफी मागितली. पण, नेमकं असं काय घडलं की रितेशला माफी मागावी लागली? याबद्दल आपण जाणून घेऊया.
कविता वाचनाच्या या आगळावेगळ्या कार्यक्रमाची सुरुवात ही राज ठाकरे यांनी केली. व्यासपीठावर राज ठाकरे यांनी भाषणास सुरुवात केल्यानंतर रितेश कार्यक्रमात पोहचला. यावेळी कार्यक्रमात पोहचण्यास उशीर झाल्यानं त्यानं ठाकरे यांच्याकडे बघून हात जोडून माफी मागितली. घड्याळाकडे हात दाखवत आपल्याला उशिर झाल्याचं सांगितलं.
'मराठी भाषा गौरव दिना'च्या या कार्यक्रमात रितेशनं वैभव जोशी यांची "जय हे'' ही कविता सादर केली. या कवितेतून त्यानं जनतेचे कान टोचले. रितेशच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तो छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. सध्या या सिनेमाचं शुटिंगही सुरू आहे.