हिंदी चित्रपटसृष्टीतील क्युट कपल म्हणून अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा या जोडीकडे पाहिलं जातं. 'तुझे मेरी कसम' या सिनेमातून दोघांनी बॉलिवूडमध्ये पहिलं पाऊल ठेवलं आणि याच सिनेमातून दोघं आयुष्यभराचे जोडीदार बनले. या दोघांच्या पहिल्या भेटीची कहाणीसुद्धा तितकीच रंजक आहे. दोघंही पहिल्यांदा हैदराबाद विमानतळावर भेटले. यावेळी १६ वर्षीय जेनिलिया तिच्या आईसोबत होती. रितेश म्हणजे महाराष्ट्रातील लोकप्रिय नेते आणि दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा लेक.
मुख्यमंत्र्यांचा मुलगा असल्याने रितेशला भारी अॅटिट्यूड असेल असं त्यावेळी जेनिलियाला वाटलं होते आणि त्याचमुळे तिने रितेशकडे दुर्लक्ष करणेच पसंत केले होते. पण असे असूनही रितेश जेनिलिया आणि तिच्या आईसमोर प्रचंड नम्रपणेच वागत होता. जेनेलिया तर चित्रीकरण सुरू झाल्यानंतरही जवळजवळ दोन दिवस रितेशशी बोललीच नव्हती. जेनेलियाने रितेशला भेटल्यावर सगळ्यात पहिल्यांदा कोणता प्रश्न विचारला होता ते त्याच्या आजही लक्षात आहे. तुझी सिक्युरीटी कुठे आहे असे तिने त्याला विचारले होते. तिच्या या प्रश्नावर रितेशला आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यावर मला सिक्युरिटी नसते असे त्याने जेनेलियाला उत्तर दिले होते.
जेनेलिया आणि रितेश यांचे अफेअर सुरू झाल्यानंतर त्यांना लगेचच लग्न करायचे होते. पण रितेशनचे वडील महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा सुरुवातीला रितेश आणि जेनेलियाच्या लग्नाला विरोध होता. जेनेलिया ही ख्रिश्चन तर रितेश हा हिंदू असल्याने विलासरावांना हे लग्न मान्य नव्हते. पण काही काळांनी त्यांचा विरोध मावळला आणि रितेश आणि जेनेलिया यांचे लग्न धुमधडाक्यात झाले. त्या दोघांनी ख्रिश्चन आणि हिंदू दोन्ही पद्धतीने विवाह केला.