Join us

कधी काळी स्पॉटबॉयचं काम करायचा रोहित शेट्टी, आज आहे इतक्या कोटी संपत्तीचा मालक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 14:53 IST

वडिलांच्या निधनानंतर रोहितला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. अशातच कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही ढासळली होती. त्यावेळी फी न भरल्यानं त्याला शाळाही सोडावी लागली होती.

बॉलिवूडमधील एकापेक्षा एक चित्रपटांचं दिग्दर्शन करणाऱ्या रोहित शेट्टी याचं नाव परिचयाचं नाही असे फारच कमी लोक आढळतील. सर्वात यशस्वी दिग्दर्शकांमध्ये आज रोहित शेट्टीचं नाव घेतलं जातं.  त्यानं दिग्दर्शन केलेल्या चित्रपटांपैकी फारच कमी चित्रपट असतील जे कोणी पाहिले नसतील किंवा ते यशस्वीही झाले नसतील. कॉमेडी, मसाला, एन्टरटेन्मेंट आणि अॅक्शननी भरलेल्या चित्रपटांसाठी त्याला ओळखलं जातं. आज रोहित शेट्टी आपला 49वा वाढदिवस साजरा करतोय. या निमित्त जाणून घेऊया त्याच्याविषयी काही माहित नसलेल्या गोष्टी 

रोहित शेट्टीच्या कुटुंबाचे कनेक्शनही बॉलिवूडमधूनच होते. त्याचे वडील एमबी शेट्टी हे इंडस्ट्रीत अॅक्शन कोरिओग्राफर, स्टंटमॅन आणि अभिनेते होते. वडिलांच्या निधनानंतर  रोहितला खूप संघर्ष करावा लागला. खूपच कमी वयात घर चालवण्याची जबाबदारी त्याच्यावर आली.

रोहितला त्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्याचे शिक्षण देखील पूर्ण करता आले नाही. परिस्थितीमुळे त्याला  कमी वयात शिक्षण सोडावे लागले. कॉलेजमध्ये जाण्यासाठी पुस्तकं आणि कपडे विकत घ्यायला त्याच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे त्याने कॉलेजमध्ये न जाता पैसे कमावण्याकडे लक्ष दिले. वडील चित्रपटसृष्टीचा भाग असल्याने त्याला चित्रपटसृष्टीविषयी नक्कीच आकर्षण होते.  सतराव्या वर्षीच असिस्टंट डायरेक्टर म्हणून त्याने काम करायला सुरुवात केली. त्याची पहिली कमाई केवळ 35 रुपये होती. फूल और काटे हा त्याचा पहिला असिस्टंट चित्रपट होता. 

रोहितने जमीन या चित्रपटाद्वारे त्याच्या दिग्दर्शकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्याचा पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला. त्यामुळे त्याला त्याच्या करियरचे चांगलेच टेन्शन आले होते. त्याच्यासोबत काम करायला कोणीच तयार नव्हते. पण अजय देवगण या त्याच्या मित्राने त्याला साथ दिली आणि त्यानंतर आलेल्या गोलमाल या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले. त्यानंतर रोहितने कधीच मागे वळून पाहिले नाही. caknowledge डॉट कॉम नुसार त्याचं एकूण नेटवर्थ २४८ कोटी रूपये इतकं आहे.

टॅग्स :रोहित शेट्टीबॉलिवूड