छोटा पडदा असो किंवा मोठा पडदा, आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणारा अभिनेता म्हणजे सौरभ गोखले. श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी या मालिकेतून छोट्या पडद्यावर एंट्री मारल्यापासून त्याने मागे वळून पाहिलेच नाही. विविध मालिकांमध्ये त्याने दर्जेदार भूमिका साकारल्या. यानंतर मराठी सिनेमा आणि रंगभूमीवरसुद्धा त्याने आपल्या अभिनयाची छाप पाडली. याच अभिनयाच्या ताकदीमुळे आता सौरभ हिंदी सिनेमातही काम करत आहे. बॉलिवूड अॅक्शनपटाचा दिग्दर्शक अशी ओळख असलेल्या रोहित शेट्टी यांच्या आगामी सिंबा सिनेमात सौरभ काम करत आहे. या सिनेमात आणि तेही रोहित शेट्टीसारख्या दिग्दर्शकासह काम करत असल्याने सौरभ सध्या खूश आहे. त्याने हाच आनंद सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. त्याने रोहित शेट्टीसोबतचा सेटवरील एक फोटो पोस्ट केला असून त्यात त्याचे तोंडभरून कौतुक केले आहे.
रोहित शेट्टीसारख्या दिग्दर्शकाच्या सिनेमातून हिंदीत पदार्पण करत असल्याचा आनंद त्याने व्यक्त केला आहे. आजवर काम केलेल्या सगळ्या दिग्दर्शकांपैकी रोहित हा सर्वोत्तम दिग्दर्शक असल्याचे त्याने नमूद केले आहे. एखादा सीन कसा चित्रीत करावा, हे त्याच्या डोक्यात फिट असते. सिनेमाची स्क्रीप्ट तो जणू काही जगत असतो आणि तो सिनेमा रोहितने मनातल्या मनात पाहिलेला असतो अशा शब्दांत सौरभने रोहितचे कौतुक केले आहे. एखादा सीन मोठ्या खूबीने समजवाण्याची आणि तो जसा हवा तसा कलाकारांकडून उत्तमरित्या करून घेण्याची अनोखी कला रोहितला अवगत असल्याचे सौरभने या पोस्टमध्ये म्हटले आहे. सिंबा या सिनेमात सौरभसह विजय पाटकर, सिद्धार्थ जाधव, नेहा महाजन आदी मराठी कलाकारांच्या भूमिका आहेत.
या सिनेमात रणवीर सिंह संग्राम भालेराव ही मराठी व्यक्तीरेखा साकारत आहे. या सिनेमातील 'मी इंस्पेक्टर संग्राम भालेराव. जो देतो त्रास, त्याचा मी घेतो घास' हा संवाद सध्या चांगलाच धुमाकूळ घालत आहे. याआधीदेखील रोहित शेट्टीच्या 'सिंघम' आणि 'सिंघम रिटर्न'मध्ये मराठी कलाकार झळकले होते. रोहित शेट्टी 'स्कूल कॉलेज आणि लाईफ' या मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहे.