रोहित शेट्टीचा 'सिंघम अगेन' (Singham Again) काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला. अजय देवगण, रणवीर सिंह, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, दीपिका पदुकोण, करिना कपूर अशी कलाकारांची तगडी फौज सिनेमात दिसली. दरम्यान सिनेमा संपल्यानंतर क्लायमॅक्समध्ये चुलबुल पांडे म्हणजेच सलमान खानचीही (Salman Khan) झलक दिसली. सलमानने सिंघम अगेनमध्ये कॅमिओ केला आहे. तसंच या माध्यमातून रोहित शेट्टीने 'मिशन चुलबुल सिंघम'ची घोषणा केली आहे. सलमानच्या कॅमिओ वर रोहित शेट्टी (Rohit Shetty) आणि अजय देवगणची (Ajay Devgn) प्रतिक्रिया समोर आली आहे.
रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समध्ये आता सलमान खानचीही अधिकृत एन्ट्री झाली आहे. याविषयी एका मुलाखतीत रोहित म्हणाला, "जेव्हा जेव्हा मी सलमानला भेटायचो तेव्हा आम्ही हेच म्हणायचो की चुलबुल आणि सिंघम सोबत आले तर काय होईल. हे गॉसिप तसंही पाच-सहा वर्षांपासून सुरुच आहे. मग मी विचार केला की या कॉप युनिव्हर्समध्ये वेगळा पैलु आणला तर हा सिनेमा लिहिताना आणि करताना मजा येईल."
सलमानला सध्या जीवाचा धोका आहे. जर त्याच्या सुरक्षेचा मुद्दा नसता तर त्याचा कॅमिओ वेगळ्या पद्धतीनेही शूट झाला असता का? यावर रोहित म्हणाला, "असं काहीच नाहीए. तुम्ही सिंघम अगेनची कथा पाहिली तर सिनेमाच्या शेवटी गोष्ट संपते. आम्ही फक्त एक टीझर दाखवलं की आता सलमानही या युनिव्हर्समध्ये आहे."
सलमानच्या कॅमिओवर अजय देवगण म्हणाला, "आम्ही एकत्रच करिअर सुरू केलं होतं. त्याने कदाचित माझ्या एक-दोन वर्ष आधी सुरुवात केली होती. आमच्यात खूप छान मैत्री आहे. सोबतच करिअर सुरू केल्याने आमचे सगळ्यांचेच एकमेकांसोबत चांगले संबंध आहेत. इतकंच नाही आम्ही एकमेकांना मध्यरात्री कोणत्याही वेळी फोन करू शकतो. आम्ही एकमेकांच्या पाठीशी कायम उभे असतो."