अबोली कुलकर्णी
‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यक्तीमत्त्वाचे मला लहानपणापासूनच आकर्षण होतं. त्यांचा आवाज, त्यांची देहबोली, त्यांची महत्त्वाकांक्षा या सर्वांनीच मी प्रभावित आहे. त्यातच योगायोगाने मला ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटात महाराजांची भूमिका ऑफर व्हावी, हा केवळ दैवी योगच, असे हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत विविध भूमिका करणारा हरहुन्नरी अभिनेता शरद केळकर म्हणाला. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याच्याशी साधलेला हा संवाद...
* ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटात तुला शिवाजी महाराजांची भूमिका करायची आहे हे कळल्यावर तुझी पहिली रिअॅक्शन काय होती? - खरंतर मला जेव्हा दिग्दर्शक ओम राऊत यांनी मला या प्रोजेक्टबद्दल सांगितले. तेव्हा मला खूप आनंद झाला की, मला एवढ्या मोठया प्रोजेक्टचा भाग होता येणार आहे. मात्र, जेव्हा त्यांनी मला माझ्या भूमिकेबद्दल सांगितले ते म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका. ही भूमिका मला साकारायची आहे हे कळाल्यावर मला धक्का बसला. सोबत भलीमोठी टीमही होती. माझ्या मनात अनेक प्रश्न होते. पण, मला ओम यांनी संपूर्ण माहिती देऊन भूमिकेसाठी तयार केले. आपण हे करू शकतो असा विश्वास माझ्या मनात निर्माण झाला. मग माझ्या भूमिकेचा प्रवास सुरू झाला. ओम राऊत यांचे दिग्दर्शन फारच अप्रतिम आहे. ते कलाकाराला टेन्शन येऊ देत नाहीत. ते सीनपूर्वी पूर्ण वातावरणनिर्मिती करतात. त्याकाळात घेऊन जातात.
* स्वत:ला महाराजांच्या भूमिकेत पाहताना मनात कोणते विचार होते? - सर्वप्रथम माझ्या मनात आले की, मी असाही दिसू शकतो, हे मला जाणवले. मी आत्तापर्यंत वेगवेगळया भूमिका केल्या. संग्राम, सूर्यभान, राजस्थानी भूमिका मी करतो. मी कुठल्याही भूमिका लीलया करू शकतो, हे प्रेक्षकांना माहिती आहे. पण, जेव्हा पोस्टर्स लाँच झाले तेव्हा मला कळाले की, होय, मी महाराजांची दमदार भूमिका नक्कीच करू शकतो. चाहत्यांचे मेसेजही मला येऊ लागले.
* भूमिकेसाठी कोणती विशेष तयारी केली?- महाराजांची देहबोली, त्यांचा आवाज, त्यांची भाषा या सर्व गोष्टी मला शिकाव्या लागल्या. मी पहिल्याच दिवशी चित्रपटाचा शेवटचा सीन केला. खरंतर चित्रपटाचा शेवटचा सीन जर पहिल्या दिवशी केला तर तो अधिक कठीण असतो. मी पहिल्या दिवशी कॉन्शियस झालो होतो. मी जेव्हा तयार होऊन महाराजांच्या गेटअपमध्ये गेलो तर सगळे जण सेटवर माझ्याकडे बघू लागले. पण, खूप मजा आली, एक वेगळा विषय आणि भूमिका मी एन्जॉय केली.
* अजय देवगणसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?- खरं सांगायचं तर मी यापूर्वीही अजय देवगण आणि काजोल यांच्यासोबत काम केले आहे. त्यामुळे आमची खूप छान बाँण्डिंग आहे. ते मराठीत बोलतात त्यामुळे मी त्यांच्यासोबत जास्तच कम्फर्टेबल होतो. ते दोघेही खूप गुणी कलाकार आहेत. तुम्ही जर चांगल्या कलाकारांसोबत काम करत असाल तर नक्कीच तुमचा परफॉर्मन्सही चांगला होतो.