Join us

भूमिका निभावणे महत्त्वाचे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2016 2:01 PM

बेनझीर जमादार         अभिनेत्री नेहा धुपिया हिने बॉलिवूडला आतापर्यंत गरम मसाला, क्या कूल है हम, ...

बेनझीर जमादार         अभिनेत्री नेहा धुपिया हिने बॉलिवूडला आतापर्यंत गरम मसाला, क्या कूल है हम, सिंग इज किंग, दे दना दन असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्याचप्रमाणे ती काही रिअ‍ॅलिटी शोमध्येदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळाली. आता ती ‘मोह माया मनी’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. तिच्या या चित्रपटाविषयी तिने लोकमत सीएनएक्सशी साधलेला मनमोकळा संवाद. १. या चित्रपटातील तुझी भूमिका काय?- या चित्रपटात माझ्या पात्राचे नाव दिव्या असे आहे. यामध्ये मी पत्रकाराची भूमिका साकारली आहे. ही भूमिका माझ्यासाठी फारच इंटरेस्ंिटग होती. खरं या चित्रपटात अमन दिव्याची कहानी आहे. पण थ्रिलर असल्यामुळे मी जास्त काही या चित्रपटाविषयी सांगू शकत नाही. माझी ही हटके भूमिका नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल अशी अपेक्षा आहे. २. या भूमिकेसाठी तू काही विशेष तयारी केली होती का?- सेलिब्रिटी असल्यामुळे पहिल्यापासूनच पत्रकारांना भेटते. त्यामुळे या भूमिकेसाठी जास्त काही करावे लागले नाही. अजून एक आवर्जून सांगावेसे वाटते की, भूमिका ही कोणतीही असो, जर तुम्ही तुमच्या भूमिकेला शंभर टक्के दिले तर ती भूमिका नक्कीच यशस्वीरित्या पार पडते. त्यासाठी तुम्हाला जास्त काही करावे लागत नाही. फक्त झोकून देत काम करण्याची तयारी असली पाहिजे. ३. तुझा चित्रपट हा भ्रष्टाचार, काळ्या पैशासंबंधी आहे. केंद्रसरकारने बंद केलेल्या हजार आणि पाचशे नोटांच्या निर्णयाविषयी तुझे मत काय?- केंद्र सरकारने हा निर्णय एकदम योग्य घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाला मी पूर्णपणे सहमत आहे. या निर्णयामुळे भ्रष्टाचार व काळ्या पैशाला नक्कीच आळा बसेल. थोडा वेळ लागेल पण सर्व काही चांगले होईल. त्याचबरोबर आमचा हा चित्रपटदेखील याच विषयासंबंधी असल्यामुळे चित्रपट प्रदर्शित करण्याची ही योग्य वेळ आहे. त्यामुळे या गोष्टीचा अधिक आनंद झाला आहे. ४. तू रिअ‍ॅलिटी शो केला आहे, त्यामुळे चित्रपट आणि रिअ‍ॅलिटी शोमध्ये काय फरक जाणवला?- रिअ‍ॅलिटी शो आणि चित्रपटांमध्ये खूप फरक आहे. रिअ‍ॅलिटी शोमध्ये तुम्हाला स्वत:ची क्षमता दाखवावी लागते. ही लढाई तुम्हाला एकटयाला लढावी लागते. चित्रपटांच्या बाबतीत तसे नसते. तेथे सामुदायिक जबाबदारी असते. कोण्या एकट्याला येथे काम करावे लागत नाही. त्याचप्रमाणे टीव्ही आणि चित्रपटांचे प्रेक्षक वर्गदेखील पूर्णपणे वेगळा असतो. ५. मराठी चित्रपटांविषयी काय सांगशील?- मराठी चित्रपट मला फार आवडतात. आता गाडीतून येतानाच मी सैराट हा चित्रपट पाहिला. हा चित्रपट खरंच मला फार आवडला. त्याचबरोबर हरिश्चचंद्राची फॅक्टरी हा देखील चित्रपट मला खूप भावला होता. आताच्या मराठी चित्रपटांची कथा पाहता, नक्कीच मला मराठी चित्रपटात काम करण्यास आवडेल. भविष्यात कोणी मराठी चित्रपटात काम करण्याची आॅफर दिली तरी नक्कीच काम करेन.