Join us

​मराठी मालिकेत-चित्रपटात झळकलेली सुजैन बर्नेट झळकणार सोनिया गांधीच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2018 11:29 AM

सुजैन बर्नेट ही मुळची जर्मनची असली तरी तिने अनेक मराठी मालिकांमध्ये, चित्रपटांमध्ये काम केले आहे. ईटीव्ही मराठीवरील कालाय तस्मै ...

सुजैन बर्नेट ही मुळची जर्मनची असली तरी तिने अनेक मराठी मालिकांमध्ये, चित्रपटांमध्ये काम केले आहे. ईटीव्ही मराठीवरील कालाय तस्मै नमः या मालिकेतील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक देखील झाले होते. तसेच उंच माझा झोका या मालिकेत देखील तिने काम केले होते. ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमात तिने अनेक गाण्यांवर बहारदार नृत्य सादर केले होते. सुजैनने या कार्यक्रमात सादर केलेल्या लावणीची चांगलीच चर्चा झाली होती. तिने मराठी प्रमाणेच काही हिंदी मालिकांमध्ये देखील काम केले होते. कसौटी जिंदगी की, ऐसा देस है मेरा, झांसी की रानी, ये रिश्ता क्या कहलाता है यासारख्या अनेक मालिकांमध्ये तिने लहान-मोठ्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. मालिकांमध्ये काम केल्यानंतर आता ती चित्रपटांमध्ये काम करणार आहे. आता ती प्रेक्षकांना एका वेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहे. संजय बारू यांच्या 'द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर: द मेकिंग अॅण्ड अनमेकिंग ऑफ मनमोहन सिंग' या पुस्तकावर आधारित एक चित्रपट येणार आहे. संजय बारू मे २००४ ते ऑगस्ट २००८ पर्यंत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे मीडिया सल्लागार होते. २०१४ लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी हे पुस्तक प्रकाशित केले होते. यामध्ये काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींच्या भूमिकेचे कास्टिंग करण्यात आले आहे. सुजैन बर्नेट ही जर्मन अभिनेत्री सोनिया गांधींची व्यक्तिरेखा साकारणार आहे. या भूमिकेसाठी आधी एका इटालियन अभिनेत्रीची निवड करण्यात आली होती. मात्र सुजैन बर्नेटच्या ऑडिशननंतर तिच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या चित्रपटात अनुपम खेर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भूमिका साकारणार आहेत. सुजैनच्या निवडीविषयी या चित्रपटाचे निर्माते सांगतात, सुजैन बर्नेट फक्त सोनिया गांधींसारखी दिसतच नाही, तर तिची संवादफेकही अत्यंत मिळती-जुळती आहे. त्यामुळे तीच या भूमिकेसाठी योग्य असल्याची आमची सगळ्यांची खात्री पटली. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला ती लवकरच सुरुवात करणार असल्याची जोरदार चर्चा आहे.