शशी कपूर यांच्या या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी साकारली होती एक्स्ट्राची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2017 8:10 AM
ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे नुकतेच मुंबईत निधन झाले. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. बॉलिवूडचे ...
ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे नुकतेच मुंबईत निधन झाले. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे देखील शशी कपूर यांच्या अंत्ययात्रेला आवर्जून उपस्थित होते. शशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या कारकिर्दीत दीवार, सुहाग, त्रिशूल, दो और दो पाच, सिलसिला, नमक हलाल, कभी कभी, काला पत्थर, शान यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्या दोघांची खऱ्या आयुष्यात खूपच चांगली मैत्री होती. शशी कपूर अमिताभ यांना प्रेमाने बबुआ अशी हाक मारायचे. ६० च्या दशकात अमिताभ बच्चन बॉलिवूडमध्ये संघर्ष करत होते. या काळात त्यांनी एका मॅगझिनमध्ये शशी कपूर यांचा फोटो पाहिला होता. अमिताभ यांनी शशी कपूर यांच्या निधनानंतर लिहिलेल्या ब्लॉगमध्ये हा किस्सा लिहिला आहे. त्यांनी लिहिले आहे की, मॅगझिनमध्ये शशी कपूर यांचा एक खूपच छान फोटो होता आणि सोबत एक कॅप्शन होती. त्यात लिहिले होते की, राज आणि शम्मी कपूर यांचा लहान भाऊ लवकरच डेब्यू करतो आहे... हे कॅप्शन वाचून मी काहीसा नाराज झालो होतो. आजूबाजूला असे लोक असतील तर माझा काहीही चान्स नाही, असे त्यावेळी माझ्या मनात आले होते. अमिताभ आणि शशी कपूर यांच्या दीवार या चित्रपटातील एक दृश्य प्रचंड गाजले होते. या चित्रपटातील शशी कपूर यांचा मेरे पास माँ है हा संवाद चांगलाच गाजला होता. या चित्रपटात शशी आणि अमिताभ यांच्या दोघांच्याही मुख्य भूमिका होत्या. पण तुम्हाला माहीत आहे का शशी कपूर यांच्या एका चित्रपटात अमिताभ यांनी एक्स्ट्राची भूमिका साकारली होती. शशी कपूर यांनी बॉम्बे टॉकी या इंग्रजी चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात अमिताभ यांनी एक्स्ट्राची भूमिका साकारली होती. शशी कपूर - द हाऊसहोल्डर द स्टार या पुस्तकात या गोष्टीचा उल्लेख करण्यात आला आहे. दीवार या चित्रटाच्या प्रीमियरच्या वेळी अमिताभ यांनी ही गोष्ट स्वतः सांगितली होती. त्यांनी म्हटले होते की, जेम्स आइवरी यांच्या बॉम्बे टॉकी या चित्रपटात मी एक्स्ट्राची भूमिका साकारली होती तर शशी त्या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. त्यांच्यासोबत मला कोणत्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारायला मिळेल असा मी कधी विचार देखील केला नव्हता. बॉम्बे टॉकी या चित्रपटात अमिताभ यांनी एक्स्ट्रा म्हणून काम केले असले तरी एडिटिंग मध्ये चित्रपटाचा तो भाग उडवण्यात आला होता. त्यामुळे प्रेक्षकांना त्यांना या चित्रपटात पाहाता आले नाही. Also Read : टू शशीजी, फ्रॉम बबुआ...! अमिताभ बच्चन यांची शशी कपूर यांना आगळी-वेगळी श्रद्धांजली!!