मिनेसोटो येथे 46 वर्षीय जॉर्ज फ्लॉयडचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण अमेरिकेत आंदोलनाची लाट उसळली आहे. कृष्णवर्णीय समुदायाचे लोक रस्त्यावर उतरले आहेत. अमेरिकेत हे आंदोलन चिघळत असताना अचानक बॉलिवूड व टीव्ही स्टार रोनित रॉयचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे भारताऐवजी तो अमेरिकेत अधिक व्हायरल होतोय. होय, अमेरिकेत रस्त्यावर उतरलेले आंदोलक या व्हिडीओचा वापर करत आहेत. हेच आंदोलक वेगवेगळ्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करत आहेत.
आता रोनित हा व्हिडीओ आणि अमेरिकेतील आंदोलन याचा काय संबंध आहे, असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. खरे तर तसा काहीही संबध नाही. रोनितने 20 एप्रिलला हा व्हिडीओ त्याच्या अकाऊंटवर पोस्ट केला होता. त्यावेळी भारतात कोरोनाने नुकतेच डोके वर काढले होते. कोरोना व्हायरसपासून बचावासाठी टी-शर्टपासून मास्क बनवण्याची पद्धत रोनितने या व्हिडीओत सांगितली होती. ‘मास्क नसेल तर चिंता करू नका़ हा मास्क तयार करणे फार सोपे आहे,’ असे त्याने व्हिडीओ शेअर करताना लिहिले होते.
रोनितचा हाच व्हिडीओ अमेरिकेत व्हायरल होतोय. आंदोनलात रस्त्यावर उतरायचे असेल आणि ओळख लपवायची असेल तर टी-शर्टचा असा मास्क बनवून चेहरा लपवा, असे सुचवण्यासाठी हा व्हिडीओ शेअर केला जात आहे. मास्क नसेल तर असा बनवा, हे सांगण्याचा प्रयत्न अमेरिकन आंदोलक करत आहे.अमेरिकेत पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय व्यक्तिचा मृत्यू झाला. याचाचा संबंध अमेरिकेतील वर्णद्वेषाची जोडला जात असून कृष्णवर्णीय लोक रस्त्यावर उतरले आहेत.