Join us

आमिर खानचा बॉडीगार्ड ते लोकप्रिय अभिनेता; अंगरक्षकाचं काम करणारा रोनित रॉय असा झाला सुपरस्टार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 13:42 IST

Ronit roy: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता असलेला रोनित रॉय एकेकाळी अभिनेता आमिर खानचा बॉडीगार्ड म्हणून काम करत होता.

एखाद्याचं नशीब कधी आणि कसं पालटेल याचा काही नेम नसतो असं अनेकदा म्हटलं जातं. कलाविश्वात तर अशा गोष्टींचा अनुभव कित्येक कलाकारांना आला आहे. अगदी सर्वसामान्य कुटुंबात लहानाचे मोठे झालेले अनेक जण आज कलाविश्वातील लोकप्रिय चेहरे म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच आज आपण प्रसिद्ध अभिनेता रोनित रॉयविषयी (Ronit Roy) जाणून घेऊ. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता असलेला रोनित रॉय एकेकाळी अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) बॉडीगार्ड म्हणून काम करत होता.

रोनित रॉय हे नाव सध्याच्या घडीला कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. अनेक सुपरहिट ठरलेल्या मालिकांमध्ये त्याने काम केलं आहे. इतकंच नाही तर अनुराग कश्यपच्या (Anurag Kashyap) उड़ान (Udaan) या चित्रपटातही तो झलकला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याने आमिर खानच्या बॉडीगार्डचं काम केल्याचा खुलासा केला.  

"मला खरं तर याविषयी बोलायचं नाही. कारण, त्यांना असं वाटतं की, मी प्रसिद्धसाठी त्यांच्या नावाचा वापर करतोय. पण, ती दोन वर्ष माझ्यासाठी अमूल्य ठरली. आमिर खान त्यांच्या कामाप्रती प्रचंड प्रामाणिक असून मेहनतीने काम करतात. मला स्टार व्हायचं होतं.आणि, मुंबईत आल्यानंतर १५ वर्ष स्ट्रगल केल्यावर मला हे पक्कं समजलं होतं की मी फक्त स्टार होण्यासाठीच मुंबईत आलोय. मला आलिशान गाड्या खरेदी करायच्या होत्या, मुलींनी माझ्या मागे धावावं असं मला वाटायचं. पण, ५-६ वर्ष मी कोणतंही ग्रेट काम करु शकलो नाही. त्यावेळी मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे एक अभिनेता होणं आणि स्टारडम यांचा काही संबंध नाही", असं रोनित रॉय म्हणाला.

पुढे ते म्हणतात, "नशीबाने मला आमिर खानसोबत काम करायची संधी मिळाली. मी दोन वर्ष त्यांचा बॉडीगार्ड म्हणून काम केलं. त्यावेळी मी माझी कंपनी सुरु केली. कारण, माझ्याकडे दुसरं काहीच काम नव्हतं. त्यामुळे मला आमिर खानसोबत काम करायला मिळालं. पण, त्यांच्याकडून मी काम कसं करावं हे उत्तमरित्या शिकलो. त्यांच्यामुळे माझे डोळे उघडले आणि मी महागड्या गाड्या, अपार्टमेंट यांचा विचार करणं सोडून दिलं आणि अभिनयावर फोकस केला. त्यावेळी योगायोगाने एकता कपूरचे दोन शो सुरु होणार होते. यात मला काम करायची संधी मिळाली.आणि, हा प्रवास आजपर्यंत सुरु आहे."

दरम्यान, रोनित रॉय छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने 'कसौटी जिंदगी की', 'क्योंकि सांस भी कभी बहू थी', 'अदालत' या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे. तसंच 'आर्मी', 'हलचल', 'उडाण', 'टू स्टेटस्', 'काबील' या चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

टॅग्स :रोनित रॉयसिनेमाटेलिव्हिजनसेलिब्रिटीआमिर खान