छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रुबिना दिलैक (Rubina Dilaik) अभिनयासोबतच तिच्या फिटनेसवर प्रचंड लक्ष देते. फिट आणि मेंटेन राहण्यासाठी रुबिना दररोज वर्कआऊट करते. नियमितपणे डाएट फॉलो करते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर रुबिनाला तिच्या वाढलेल्या वजनावरुन ट्रोल केलं जात आहे. त्यामुळे सतत होत असलेल्या ट्रोलिंगला कंटाळून रुबिनाने एक पोस्ट शेअर करत ट्रोलर्सला सुनावलं आहे. इतकंच नाही तर 'माझे चाहते म्हणून मिरवणं बंद करा', असंही तिने सांगितलं आहे.
अलिकडेच रुबिनाने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने ट्रोलर्सला चांगलंच धारेवर धरलं आहे. तसंच केवळ माझ्या सौंदर्यावर किंवा माझ्या फिटनेसकडे पाहून मला फॉलो करत असाल तर करु नका असंही तिने थेट सांगितलं आहे.
काय म्हणाली रुबिना?
"माझ्या प्रिय हितचिंतकांनो, मी बऱ्याच दिवसांपासून पाहते माझ्या वाढलेल्या वजनामुळे तुम्ही सगळेच चिंतीत आहात. तुम्ही सातत्याने मला तिरस्काराने भरलेले मेसेज, मेल पाठवत आहात. जर मी एखादा पीआर नेमत नसेल तर तुम्हाला माझं कर्तृत्व दिसत नाही. मी जाड झाले, चांगले कपडे परिधान करत नाही, मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये काम करण्यासाठी मी मेहनत करत नाही. या कारणामुळे तुम्ही माझे चाहते राहणार नाही अशी धमकी देताय?", असं रुबिना म्हणते.
पुढे ती म्हणते, "मला खरंच फार वाईट वाटतंय. कारण, माझं टॅलेंट, काम करण्याची पद्धत यापेक्षा तुम्हाला माझ्या शरीरिक सौंदर्याचं अधिक आकर्षण वाटतं. ते जास्त महत्त्वाचं वाटतं. पण, तुमच्या सगळ्यांसाठी माझ्याकडे एक गोड बातमी आहे. हे माझं आयुष्य आहे आणि त्यातील प्रत्येक टप्पा वेगवेगळा आहे.आणि, तुम्ही सुद्धा माझ्या जीवनाचा एक भाग आहात. मला माझ्या चाहत्यांचा आदर आहे. पण, आता तुम्ही माझे चाहते असल्याचं सांगणं आणि मिरवणं बंद करा."
दरम्यान, मध्यंतरी रुबिनाला कोरोनाची लागण झाली होती. या कोविडवर मात केल्यानंतर रुबिनाचं वजन झपाट्याने वाढलं आहे. सप्टेंबरमध्ये रुबिनाने एक पोस्ट शेअर करत तिचं वजन ७ किलोने वाढल्याचं तिने सांगितलं होतं. वाढलेल्या वजनामुळे ती त्रस्त होती. सोबतच तिचा आत्मविश्वासही डळमळीत झाल्याचं तिने सांगितलं होतं.