पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांची समजूत काढून त्यांना घरी पाठवले.
कोरोना व्हायरसच्या वाढत्या संकटामुळे आधीच लोक दहशतीत जगत आहेत. तसेच आता लॉकडाउनचा चौथा टप्पा अवलंबण्यात आला आहे. या लॉकडाउनमुळे अनेक व्यवसाय ठप्प आहेत. त्यामुळे रोजगारही थांबला आहे. अशात अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यात सोशल मीडियावर तर अफवांनी कहर केला आहे. अशात भिवंडी शहरात बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान मदत करण्यासाठी येणार असल्याची अफवा पसरवण्यात आल्यामुळे खळबळ माजली आहे.सलमान खान येणार म्हटल्यावर रात्री खंडूपाडा परिसरात चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. मात्र यावेळी सोशल डिस्टसिंगचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचे पहायला मिळाले.
याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांची समजूत काढून त्यांना घरी पाठवले. याबद्दल पोलीस तपास करत आहेत.
कोरोना व्हायरसच्या या संकटात सलमान खान त्याला शक्य होईल ती मदत करत आहे. यापूर्वी आमीर खानच्या नावाने अफवा पसरली होती. त्यावेळी पिठाच्या पिशव्यांमध्ये 15 हजार रुपये आढळल्याची बातमी सोशल मीडियावर फिरत होती. यावेळीदेखील पैसे मिळतील या भावनेने लोकांनी अफवेवर विश्वास ठेवला आणि भिवंडीत गर्दी केली. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत होता. ज्यामध्ये असे सांगण्यात आले होते की बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने पैशांचे वाटप छूप्या पद्धतीने केले. म्हणजे गव्हाच्या पॅकेट्समधून त्याने अनेकांना मदत केली. त्याचे अभिनंदनही या व्हिडिओतून करण्यात आले होते. मात्र व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओ मागील सत्यता स्वत: आमीर खानने ट्विटरच्या माध्यमातून सांगितली होती.