सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीचा वाद पुन्हा चव्हाट्यावर आला असताना आता अभिनेत्री व भाजपा नेत्या रूपा गांगुली यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. होय, घराणेशाहीला खतपाणी घालणा-या लोकांचे चित्रपट पाहणे बंद करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.आयएएनएसला दिलेल्या एका ताज्या मुलाखतीत रूपा गांगुली यांनी बॉलिवूडमधील घराणेशाहीवर सडकून टीका केली. यापुढे काही लोकांचे चित्रपट पाहणे मी बंद करणार आहे. हेच ते लोक आहेत, जे छोट्या शहरांमधील मुला-मुलींना इंडस्ट्रीत येऊ नये असा संदेश देतात. नेपोटिजम, घराणेशाही प्रत्येक क्षेत्रात आहे. पण घराणेशाही इतकी वाढू नये की, ज्यामुळे लोक आत्महत्या करायला बाध्य होतील, असे रूपा गांगुली म्हणाल्या. आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.
याआधी रूपा गांगुली यांनी सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती. यावरही त्या बोलल्या. त्या म्हणाल्या, ‘सुशांतच्या आत्महत्येनंतर लगेच त्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे म्हटले गेले. सुशांतच्या घरी सुसाइड नोट मिळाली नाही. असे असताना पोस्टमार्टम रिपोर्ट मिळण्याआधीच सुशांतने आत्महत्या केली, या निष्कर्षावर पोलिस कसे पोहोचले? अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत. पण अद्यापही अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. त्याच्या शरीरावर अनेक खुणा आहेत त्या कशाच्या? पोलिसांनी त्याचे घर सील का केले नाही? सुशांतचा पाळीव कुत्रा कुठे आहे? अद्याप कुणाला अटक का झाली नाही? ही आत्महत्या आहे, हे पोलिस अद्याप सिद्ध करू शकलेले नाही,’ असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केलेत.
रुपा गांगुली यांनी याआधीही सुशांतच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील पोस्टवरून संशय व्यक्त केला होता.सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. आपल्या या ट्विटमध्ये त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरवर टॅग केले होते.