अभिनेता हृतिक रोशन ( Hrithik Roshan )सुजैनसोबत घटस्फोट झाल्यानंतर आत्ता आत्तापर्यंत सिंगल होता. पण आता कदाचित तो प्रेमात पडला आहे. होय, गेल्या काही दिवसांपासून त्याच्या व सबा आझादच्या (Saba Azad) डेटींगच्या चर्चा जोरात आहेत.
एका डिनर डेटनंतर हृतिक सबाचा हात पकडून रेस्टॉरंटबाहेर पडत असताना दिसला आणि दोघांच्या डेटींगच्या चर्चा सुरू झाल्या. यानंतर दोघांनाही अनेकदा एकत्र स्पॉट केलं गेलं आहे. इतकंच नाही तर हृतिकच्या फॅमिलीसोबत ती लंच डेट एन्जॉय करतानाही दिसली. अशात आता हृतिक व सबा या दोघांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलंय. हृतिकच्या एका जवळच्या मित्रानं या दोघांच्या लग्नाबाबत मोठा खुलासा केला आहे.
हृतिक आणि सबा यांच्या एका जवळच्या मित्रानं नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर सबा व हृतिकच्या लग्नाच्या प्लॅनिंगबद्दल खुलासा केला. ‘इंडिया टुडे’शी बोलताना तो म्हणाला, ‘हृतिक व सबा दोघंही एकमेकांना पसंत करतात. एवढंच नाही तर हृतिकच्या कुटुंबीयांनाही सबा खूप आवडली आहे. विशेषत: तिचं म्युझिक सर्वांना आवडलं. अलिकडेच सबा हृतिकच्या घरी गेली होती त्यावेळी तिने त्याच्या फॅमिलीसाठी एक छोटंसं म्युझिक सेशन ठेवलं होतं. सर्वांनी ते खूप एन्जॉय केलं. तूर्तास त्यांच्या लग्नाबद्दल बोलणं घाईचं ठरेल. यासाठी वेळ हवा आहे. त्यांना कोणताही निर्णय घ्यायची घाई करायची नाहीये.
सबा व हृतिकची पहिली भेट कशी झाली?
हृतिक आणि सबाची ओळख एका कॉमन फ्रेंडद्वारे झाली होती. पहिल्या भेटीपासून दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. त्यानंतर ते एका डिनर डेटवर भेटले. खरं तर ही भेट कामासंदर्भात होती. पण तिथून सबा व हृतिक सगळ्यांच्या नजरेत भरले.मिड डेच्या वृत्तानुसार, सबा व हृतिक सुट्टीसाठी गोव्यात गेले होते. अनेक रिपोर्टनुसार, हृतिक व सबा एकमेकांना डेट करत आहेत. मात्र हे रिलेशन त्यांना पब्लिक करायचं नसल्याने गप्प आहेत. दोघंही आपलं खासगी आयुष्य सीक्रेट ठेवू इच्छितात.
सबा आझाद एक बॉलिवूड अभिनेत्री आहे. 1 नोव्हेंबर 1990 रोजी जन्मलेली आणि दिल्लीत लहानाची मोठी झालेल्या सबाने थिएटर आर्टिस्ट म्हणून अॅक्टिंग करिअरला सुरूवात केली. यानंतर ती चित्रपटांकडे वळली. 2008 साली ‘दिल कबड्डी’ या सिनेमातून तिचा डेब्यू झाला. यात ती राहुल बोससोबत स्क्रिन शेअर करताना दिसली होती. पण तिला ओळख दिली ती 2011 साली रिलीज ‘मुझसे फ्रेन्डशिप करोगे’ या सिनेमाने. यात तिच्या अपोझिट साकिब सलीम दिसला होता. त्याआधी सबाने अनेक शॉर्ट फिल्म्समध्ये काम केलं आहे. 2021 साली म्हणजे गतवर्षी ती ‘फील्स लाइक इश्क’ या सिनेमात दिसली होती.
2010 साली सबाने स्वत:ची थिएटर कंपनी उघडली होती. सबाला थिएटरसोबत गाण्याचाही शौक आहे. नसीरूद्दीन शाह यांचा मुलगा इमाद शाहसोबत तिने ‘Madboy / Mink’ या इलेक्ट्रॉनिक बँडची सुरूवात केली होती़ 2013 साली इमादने सबासोबतचं रिलेशनशिप पब्लिक केलं होतं. सबा व मी दोन वर्षांपासून एकत्र राहत असून मी रिलेशनशिपमध्ये आहे, असं इमाद म्हणाला होता. या रिलेशनशिपचं पुढे काय झालं, ते अद्याप गुलदस्त्यात आहे. 2013 साली यशराज फिल्म टॅलेंट डिव्हिजनने ‘धूम अँथम’चा व्हिडीओ आपल्या युट्यूब चॅनलवर रिलीज केला होता़ यात सबाला कास्ट करण्यात आलं होतं. या अँथमला तिनं आपला आवाज दिला होता.