Join us

 इतका भोळाभाबडा विचार सुप्रिया यांनी सचिन यांना दिला होता लग्नासाठी होकार...!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 10:26 IST

मराठी इंडस्ट्रीतील एक परफेक्ट कपल म्हणजे, सचिन पिळगावकर व सुप्रिया पिळगावकर

ठळक मुद्दे सचिन हे मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले नाव होते आणि सुप्रिया केवळ 16 वर्षांच्या होत्या. दोघांमध्ये तब्बल ११ वर्षांचे अंतर होते.

मराठी इंडस्ट्रीतील एक परफेक्ट कपल म्हणजे, सचिन पिळगावकर व सुप्रिया पिळगावकर.  आज या दोघांचाही वाढदिवस.      ‘नवरी मिळे नव-या’ला या चित्रपटाच्या सेटवर सचिन आणि सुप्रिया या दोघांचीही पहिली भेट झाली होती. सचिन या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. तसेच ते सिनेमात अभिनय देखील करीत होते. तर सुप्रिया चित्रपटाची हिरोईन होत्या.  याच चित्रपटाच्या सेटवर दोघांचीही प्रेमकहाणी फुलली. परंतु  दोघांनीही आपले नाते काही काळ लपवून ठेवले. एक अभिनेत्री दिग्दर्शकाच्या प्रेमात पडली अशा चर्चा त्यांना होऊ द्यायच्या नव्हत्या.

 

सचिन यांनी ‘नवरी मिळे नव-याला’ या चित्रपटाच्या सेटवर सुप्रिया यांना पाहिले आणि  पाहत्याक्षणी ते त्यांच्या प्रेमात पडले हाते.  मात्र सुप्रिया यांना मनातल्या भावना कशा सांगायच्या, हा प्रश्न त्यांना अस्वस्थ करत होता.  काही केल्या सुप्रियांशी बोलायचे धाडस त्यांना होईना. पण एक दिवशी हिंमत करुन ते सुप्रियाकडे गेले आणि त्यांनी त्यांना  लग्नाबद्दल विचारलेच. यावर सुप्रिया काय म्हणाल्या होत्या माहितीये. ‘अहो मला वाटले तुमचे लग्न झाले असेल,’असे सुप्रिया म्हणाल्या. आधी तर सुप्रिया आपली मजा घेत आहेत, असेच सचिन यांना वाटले. पण नंतर  सुप्रिया गंभीर आहेत, हे पाहून त्यांनी आपण अजूनही सिंगल असल्याचे सांगितले होते.

सुप्रिया यांनी सचिन यांचे बालपणीचे अनेक चित्रपट पाहिले होते. सचिन यांचे बालपणीचे ते रुप त्यांना फार आवडायचे.विश्वास बसणार नाही पण सचिन यांच्याशी लग्न केल्यावर आपल्यालाही त्यांच्या बालपणीच्या रुपाप्रमाणेच गोंडस मुले होणार, असा इतकाच भोळाभाबडा विचार सुप्रिया यांनी केला आणि लग्नाला होकार दिला होता.

   सुप्रिया यांनी  सुरुवातीला सचिन व त्यांच्या नात्याबद्दल   घरी सांगितले नव्हते. सचिन हे मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले नाव होते आणि सुप्रिया केवळ 16 वर्षांच्या होत्या. दोघांमध्ये तब्बल ११ वर्षांचे अंतर होते. घरच्यांना ही गोष्ट समजली तर ते कसे रिअ‍ॅक्ट होतील याची भीती सुप्रिया यांना  होती. 

सुप्रिया यांनी बारावी बोर्डाची प्रिलीम परिक्षा दिली नव्हती. कॉलेजकडून सुप्रिया यांच्या घरी परिक्षा दिली नसल्याचे लेटर गेले. त्यानंतर सुप्रिया व सचिन यांच्या प्रेमाचे बिंग फुटले. पण सुप्रियाच्या घरच्यांनी शांतपणे ही स्थिती हाताळली. काही दिसांनंतर ते सचिन यांच्या आई-वडिलांना भेटले आणि अवघ्या सहा महिन्यांनंतरच सचिन  व सुप्रिया यांचे लग्न झाले.

टॅग्स :सचिन पिळगांवकरसुप्रिया पिळगांवकर