Join us

संयमीच्या भेटीला आला 'क्रिकेटचा देव', म्हणाला- मला तुझी बॉलिंग बघायचीये..

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 12:31 PM

'घूमर' सिनेमा पाहिल्यानंतर सचिन तेंडुलकरला संयमीचं काम खूपच आवडलं.

अभिषेक बच्चन आणि संयमी खेर यांची मुख्य भूमिका असलेला 'घुमर' सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. प्रत्येक जण सिनेमाचं कौतुक करताना दिसतोय. मुंबईत सिनेमाची स्क्रीनिंगही आयोजित केली गेली. यासाठी क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. नुकतंच क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने संयमीची भेट घेत तिची गोलंदाजी बघायची इच्छा व्यक्त केली. खुद्द सचिन तेंडुलकरकडून कौतुक होतंय हे पाहून संयमीही भारावली. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.

'घूमर' सिनेमा पाहिल्यानंतर सचिन तेंडुलकरला संयमीचं काम खूपच आवडलं. फक्त एका हाताने संयमी कशी खेळली असेल याचं त्याला कुतुहल वाटत होतं. सिनेमात पाहिलं पण प्रत्यक्षातही त्याला तिची बॉलिंग पाहण्याची इच्छा झाली. म्हणून त्याने संयमीची भेट घेत तिला बॉलिंग टाकायला सांगितली. त्यांच्या भेटीचा किस्सा संयमीने सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. आपण पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरतं तेव्हा काय आनंद होतो तो तिने मांडला आहे. तसंच सचिनसमोर बॉलिंग करतानाचा व्हिडिओही शेअर केला आहे.

काय आहे सिनेमाची कथा?

संयमीने 'घुमर' सिनेमात अनिनी या महिला क्रिकेटपटूची भूमिका साकारली आहे. भारतीय क्रिकेट संघात खेळायचं तिचं स्वप्न असतं. तिची निवडही होते पण अचानक एका अपघातात अनिनी उजवा हात गमावते. यामुळे ती फलंदाजी करु शकत नाही. मग ती भारतीय संघात कशी खेळणार हा प्रश्न तिच्यासमोर असतो.  या दु:खातून सावरत ती डाव्या हाताने खेळायला शिकते. अभिषेक बच्चन यासाठी तिला प्रशिक्षण देतो. क्रिकेट म्हणजे फक्त फलंदाजीच नाही तर गोलंदाजीही आहे हे तो तिला समजावतो. अनिनी मेहनत घेते आणि डाव्या हाताने गोलंदाजी करत क्रिकेट संघात खेळते. 

'घुमर' आर बाल्की यांनी दिग्दर्शित केला आहे. सध्या सगळेच सिनेमाचं यश एन्जॉय करत आहेत. अभिषेक बच्चनच्याही भूमिकेचं कौतुक होतंय.  'गदर 2' च्या वादळात 'घुमर' फारशी कमाई करु शकला नाही. मात्र सिनेमाची माऊथ पब्लिसिटी प्रचंड होत आहे.

टॅग्स :संयमी खेरसचिन तेंडुलकरबॉलिवूडसिनेमा