Join us

'सेक्रेड गेम्स'मधील 'ह्या' अभिनेत्याची '८३' चित्रपटात लागली वर्णी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 19:43 IST

बंटी या खलनायकाच्या भूमिकेतून प्रसिद्ध झालेला जतीन सरनाची '८३' चित्रपटात वर्णी लागली आहे.

नेटफ्लिक्सवरील 'सेक्रेड गेम्स' वेबसीरिजला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली. आता या सीरिजचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजमधील सर्व पात्र खूप लोकप्रिय झाले. या वेबसीरिजमधून बंटी या खलनायकाच्या भूमिकेतून प्रसिद्ध झालेला जतीन सरनाची '८३' चित्रपटात वर्णी लागली आहे. तो या चित्रपटात क्रिकेटर यशपाल शर्मा यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

'८३' चित्रपटात वर्णी लागल्यामुळे जतीन खूप खूश आहे. त्याने या चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान यांच्यासोबत घडलेला एक किस्सा शेअर केला आहे. त्याने सांगितले की, 'बॉलिवूडमध्ये काम करण्याच्या आधीचा काळ होता. मी मित्रांसोबत रिक्षाने जात होतो. समोरून दिग्दर्शक कबीर खान यांची गाडी येत होती आणि मी त्यांना हात दाखवला, त्यांनीही मला प्रतिसाद दिला. एवढ्या मोठ्या माणसाने मला हात दाखवला हे पाहून माझे मित्रही थक्क झाले. मी कबीर खानला ओळखतो का, असे मित्रांनी मला विचारले अर्थात ते मला ओळखत नव्हते. पण या व्यक्तीसोबत मी भविष्यात नक्की काम करेन आणि ते मला ओळखू लागतील असे मी त्यांना सांगितले होते. योगायोग म्हणजे इतक्या वर्षांनंतर मी सहज बोलून गेलेली गोष्ट आता सत्यात होते आहे.'

 

लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर २५ जून, १९८३ या दिवशी भारतीय संघाने क्रिकेट वर्ल्डकप जिंकला होता. त्यामुळे हा दिवस भारताच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरात कोरला गेला आहे. याच क्रिकेट विश्वचषक विजयावर '८३' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंग कपिल देवच्या भूमिकेत दिसणार आहे. रणवीर सिंग व जतीन सरनासोबत या चित्रपटात आदिनाथ कोठारे, चिराग पाटील, ताहिर भसीन हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

टॅग्स :सॅक्रेड गेम्स८३ सिनेमा