'सेक्रेड गेम्स' या वेबसिरिजच्या दुसऱ्या भागाची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. 'सेक्रेड गेम्स'ला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद लाभला होता. ही वेबसिरिज विक्रम चंद्रा यांच्या सेक्रेड गेम्स (२००६) या कादंबरीवर आधारीत होती. नेटफ्लिक्सवर प्रसारित झालेल्या या वेबसिरिजची चांगलीच चर्चा झाली होती. सेक्रेड गेम्समध्ये सैफ अली खान एका पोलिसाच्या भूमिकेत दिसला होता तर नवाजुद्दीनने गँगस्टर गायतोंडेची भूमिका साकारली होती. ही वेबसिरिज संपल्यानंतर याचा दुसरा भाग कधी येणार हे सैफ अली खान, नवाझुद्दीन सिद्दीकी यांना अनेक मुलाखतींमध्ये आजवर विचारण्यात आलेले आहे. आता नवाझुद्दीनने एका मुलाखतीत ही वेबसिरिज प्रेक्षकांच्या कधी भेटीस येणार याविषयी सांगितले आहे.
प्रेक्षकांची लाडकी 'सेक्रेड गेम्स २' वेबसिरिज जून ते ऑगस्टच्या दरम्यान प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून 'सेक्रेड गेम्स' चा हा दुसरा भाग इतका दमदार असणार आहे की, प्रेक्षक या वेबसिरिजचा पहिला भाग विसरून जातील असे नवाझुद्दीनने त्याच्या मुलाखतीत सांगितले आहे.
'सेक्रेड गेम्स' या वेबसिरिजच्या पहिल्या भागाचे दिग्दर्शन अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवाने यांनी दोघांनी मिळून केले होते. पण दुसऱ्या सिझनमध्ये विक्रमादित्यची जागा नीरज घयवानने घेतली आहे. या सिझनविषयी 'सेक्रेड गेम्स २'चा कास्टिंग डायरेक्टर शिवम गुप्ता सांगतो, 'सेक्रेड गेम्स' या वेबसिरिजमधील सगळ्याच कलाकारांच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले होते. आता दुसऱ्या सिझनमध्ये देखील तितकेच दमदार कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
'सेक्रेड गेम्स'मध्ये नवाझुद्दीन सिद्दीकीने गणेश गायतोंडे ही भूमिका साकारली होती तर सरताज सिंग या भूमिकेत सैफ अली खान झळकला होता. या दोघांच्या अभिनयाच्या आणि लूकच्या प्रेक्षक अक्षरशः प्रेमात पडले होते. या वेबसिरिजच्या पहिल्याच भागात गायतोंडेची हत्या झाली असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले होते. त्याची हत्या का झाली, कशाप्रकारे करण्यात आली, त्याच्या हत्येमागे काय रहस्य होते. यातील काही प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना पहिल्या सिझनमध्ये मिळाली होती आणि आता या सिझनमध्ये यामागची अनेक रहस्य उलगडली जाणार आहेत. या सिझनचे चित्रीकरण मुंबईसह केप टाऊन, जोहान्सबर्ग आणि साऊथ आफ्रिकेत झाले आहे.