मराठी आणि हिंदी कलाविश्वात आपलं अढळ स्थान निर्माण करणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे सदाशिव अमरापूरकर (Sadashiv Amrapurkar). खलनायिकी भूमिका साकारुन तुफान लोकप्रियता मिळणाऱ्या या अभिनेत्याचं निधन होऊन बराच काळ लोटला. मात्र, आजही सोशल मीडियावर त्यांची चर्चा रंगताना पाहायला मिळते. उत्तम अभिनयकौशल्याच्या जोरावर त्यांनी अनेक पुरस्कार पटकावले. त्यामुळे त्यांच्या प्रोफेशनल लाइफविषयी जवळपास साऱ्यांनाच माहित आहे. मात्र, त्यांच्यै वैयक्तिक आयुष्याविषयी फारसं कोणाला ठावूक नाही. सदाशिव आमरापूरकर या नावाने प्रसिद्ध झालेल्या या कलाकाराचं खरं नाव काही वेगळंच असल्याचं समोर आलं आहे.
कधी विनोदी, कधी खलनायिकी तर कधी स्त्री पात्र अशा वेगवेगळ्या रुपात पडद्यावर वावरणाऱ्या सदाशिव अमरापूरकर यांचं खरं नाव गणेश कुमार नरवोडे असं असल्याचं सांगण्यात येतं. 1974 साली त्यांनी रंगभूमीवरुन आपल्या अभिनयाची कारकीर्द सुरु केली. त्यावेळी नाटकातून कामाला सुरुवात केल्यावर त्यांनी सदाशिव हे नाव धारण केले.
दरम्यान, सदाशिव अमरापूरकर यांचे 2014 साली किडनीच्या विकाराने निधन झाले. अभिनयाच्या प्रवासासोबत त्यांनी सामाजिक बांधिलकी देखील जपली होती. विविध सामाजिक संस्थेशी ते जोडले गेले होते. मेधा पाटकर यांच्यासोबत नर्मदा आंदोलन, अंधश्रद्धा निर्मूलन समिती अशा वेगवेगळ्या सामाजिक संस्थेशी ते जोडले गेले होते. सदाशिव अमरापूरकर यांच्या नावाने ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. या ट्रस्ट मार्फत गरजूंना आजही मदतीचा हात दिला जातो.