मेरा साया, आरजू, एक फूल दो माली, लव इन शिमला, वक्त, वो कौन थी असे एकापेक्षा एक हिट चित्रपट देणा-या अभिनेत्री साधना शिवदासानी आज आपल्यात नाहीत. 25 डिसेंबर 2015 रोजी वयाच्या 74 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. आज साधना आठवण्याचे कारण म्हणजे, आज (2 सप्टेंबर)त्यांचा वाढदिवस. त्या काळात चुडीदार सलवान आणि साधना हेअरकट आणण्याचे श्रेय साधना यांना जाते. त्यांची हेअरस्टाईल आजही साधना हेअरकट नावाने प्रसिद्ध आहे.
2 सप्टेंबर 1941 रोजी कराची, सिंध (सध्याचे पाकिस्तान)मध्ये साधना यांचा जन्म झाला होता. फाळणीनंतर साधनांचे कुटुंबीय 1947 मध्ये कराची सोडून मुंबईत स्थायिक झाले. अनेकांना ठाऊक नसावे की, साधना या करिश्मा-करीना कपूरची आई आणि अभिनेत्री बबीता यांच्या चुलत बहीण होत्या.
साधना यांना लहानपणापासूनच अभिनय आणि नृत्याची आवड होती. लेकीची आवड पूर्ण करण्यासाठी त्यांच्या वडिलांनी बरेच प्रयत्न केले. त्यांना डान्स क्लासमध्ये पाठवले. साधना ज्या डान्स क्लासमध्ये डान्स शिकायला जायच्या, त्या क्लासमध्ये एकदिवस एक नृत्यदिग्दर्शक आलेत. त्यांना राजकपूर यांच्या आगामी सिनेमासाठीडान्स शिकणा-या विद्याथीर्नींची गरज होती. हा चित्रपट होता ‘श्री 420’. साधना यांच्या डान्स टिचरने काही मुलींची निवड केली. निवड झालेल्या मुलींमध्ये साधना सुद्धा होती. ‘श्री 420’मधील ‘मूड मूड के ना देख’ या गाण्यात साधना यांना संधी मिळाली.
या गाण्यात साधना ‘कोरस गर्ल’ म्हणून दिसल्या होत्या. साहजिकच कुणाचेच त्यांच्याकडे लक्ष गेले नाही. पण या गाण्याच्या शूटींगदरम्यान असे काही घडले की, साधना राज कपूर यांचा द्वेष करू लागल्या होत्या. असे म्हणतात की, ‘श्री 420’च्या सेटवर साधना आपल्या हेअरस्टाईलवर खास लक्ष द्यायच्या. राज कपूर यांना ते अजिबात आवडले नाही. ते इतके संतापले की, त्यांनी ‘तू अॅक्टिंग सोडून लग्न करायला हवे,’ अशा शब्दांत साधना यांना सुनावले होते. राज कपूर यांचे ते शब्द ऐकून साधनाही संतापल्या होत्या आणि सेट सोडून निघून गेल्या होत्या. अर्थात यानंतर 6 वर्षांनी दोघांनीही ‘दुल्हा दुल्हन’ सिनेमात साधना व राज कपूर यांनी एकत्र काम केले होते.
वयाच्या 15 व्या वर्षी साधना यांनी शाळेच्या एका नाटकात भाग घेतला होता. त्याचदरम्यान एका निर्मात्यांची नजर त्यांच्यावर पडली आणि त्यांनी 1 रूपयांचे टोकन मनी देऊन साधना यांना आपल्या ‘अबाना’ या सिंधी चित्रपटासाठी साईन केले होते. पण नशीबाने एक वेगळाच खेळ खेळला. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान साधनांचा फोटो एका मॅगझिनमध्ये झळकला. त्याकाळचे सुप्रसिद्ध निर्माते शशीधर मुखर्जी यांनी नजर या फोटोवर पडली आणि ते साधना यांना हिमालय अॅक्टिंग स्कूलमध्ये घेऊन गेलेत. यानंतर त्यांनी साधना यांना आपल्या मुलासोबत ‘लव इन शिमला’ या चित्रपटातून लॉन्च केले. आर. के. नय्यर दिग्दर्शित हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आणि साधना यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.
‘लव इन शिमला’ याच सिनेमाच्या शूटिंगदरम्यान साधन यांचे आर. के. नायर यांच्यासोबत प्रेम झाले आणि त्यांनी लग्न केले होते. 1995मध्ये अस्थमामुळे नायर यांचे निधन झाले होते.