बॉलिवूडमधील आजकालच्या अनेक अभिनेत्री त्यांच्या स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे. त्यांचे फॅन्स त्यांच्या स्टाईलची नेहमीच कॉपी करतात. आजकालच्या अभिनेत्रींची स्टाईल कॉपी करणे यात काही नवीन नाही. पण साठीच्या दशकातील एका अभिनेत्रीच्या स्टाईल स्टेटमेंटच्या अनेक लोक प्रेमात होते. ही अभिनेत्री म्हणजे साधना. साधना यांच्या केसांच्या स्टाईलची त्याकाळात इतकी चर्चा झाली होती की, त्यांच्या केसाच्या कटाला साधना कट असेच म्हटले जात असे. साधना या त्यांच्या स्टाईल इतक्याच त्यांच्या अभिनयासाठी देखील प्रसिद्ध होत्या. त्यांच्या अभिनय कौशल्याचे नेहमीच कौतुक केले जात असे.
साधना यांनी २५ डिसेंबरला या जगाचा निरोप घेतला. साधना यांना लहानपणापासून अभिनयाची आवड होती. त्यांनी श्री ४२० पासून या चित्रपटाद्वारे त्यांच्या अभिनयकारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात त्या बालकलाकाराच्या भूमिकेत दिसल्या होत्या. इचक दाना... या गाण्यात आपल्याला अनेक लहान मुलं पाहायला मिळाली होती. या लहान मुलांमधील एक मुलगी ही अभिनेत्री साधना होत्या. त्यानंतर त्यांना अबाना या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.
अभिनेता जॉय मुखर्जी यांचे वडील निर्माते सशाधर मुखर्जी यांना त्यांच्या मुलाला बॉलिवूडमध्ये लाँच करायचे होते. ते नायिकेच्या भूमिकेसाठी एका नव्या चेहऱ्याच्या शोधात होते. त्याचवेळी अबाना हा चित्रपट केल्यानंतर एका मासिकात साधना यांचा फोटो छापून आला होता. हा फोटो पाहूनच त्यांनी लव्ह इन शिमला या चित्रपटासाठी साधना यांना साईन केले. या चित्रपटामुळे साधना मोठ्या स्टार बनल्या. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाइतकी त्यांच्या हेअर स्टाईलची चर्चा झाली. या त्यांच्या लूकसाठी अनेक ट्रायल्स दिग्दर्शकाने घेतल्या होत्या. साधना यांची ही हेअरस्टाईल हॉलिवूड अभिनेत्री आँड्रे हेपबर्न यांच्यासारखी करण्यात आली होती.
साधना यांनी मेरा साया, राजकुमार, मेरे महबूब, और वो कौन थी यांसारख्या अनेक चित्रपटामध्ये काम केले आहे. साधना या प्रसिद्धीच्या झोतात असताना त्यांना थॉयराईड झाला. त्या उपचारासाठी अमेरिकेला गेल्या. त्या आता पुन्हा चित्रपटांमध्ये काम करणार नाहीत असे त्यांच्या चाहत्यांना वाटायला लागले होते. पण त्यांनी त्यानंतर पुन्हा येऊन इंतकाम, एक फूल दो माली यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. इंतकाम आणि एक फूल दो माली हे त्यांचे चित्रपट चांगलेच गाजले होते. साधना या ७४ वर्षांच्या असताना कॅन्सरमुळे त्यांचे निधन झाले.