Oscar 2023 Sadhvi Prachi : दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या RRR चित्रपटातील नाटू नाटू गाण्याने ऑस्कर जिंकला आणि भारतीयांचा ऊर अभिमानानं भरून आला. नाटू नाटूने ऑस्कर जिंकल्यानंतर राजामौलींनी आणि त्यांच्या टीमवर कौतूकाचा वर्षाव होतो आहे. संपूर्ण देशात जल्लोषाचं वातावरण आहे. याचदरम्यान विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी याबद्दल केलेलं ट्विट चर्चेत आलं आहे. नाटू नाटूला ऑस्कर मिळाल्याबद्दल त्यांनी भारतीयांचं अभिनंदन केलं आहे. शिवाय एक अजब दावाही केला आहे.
ज्या चित्रपटातील व्यक्तिरेखांचं नाव राम आणि सीता आहे, त्या चित्रपटाला ऑस्कर मिळणार नाही, असं कसं होणार, अशा आशयाचं ट्विट साध्वी प्राची यांनी केलं आहे. ट्विट करताना साध्वी प्राची यांनी भारताच्या तिरंग्याचा इमोजीही शेयर केला आहे.
साध्वी प्राची या ट्विटवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. असं असेल तर मग रामसेतू का फ्लॉप झाला, असा खोचक सवाल एका युजरने केला आहे. दीदी, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी स्वत:चा राजकीय लाभ दिसतो ना, अशी कमेेंट एका युजरने केली आहे. भाजपा नेते या सिनेमाला विरोध करत होते, तेव्हा तुम्ही कुठे होता, असा सवाल अन्य एका युजरने केला आहे.
‘नाटू नाटू’ हे 2022 मधील सर्वांत हिट गाण्यांपैकी एक आहे. एम. एम. किरवाणी यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं. तर कालभैरव आणि राहुल सिप्लीगुंज यांनी हे गाणं गायलं आहे. चंद्रबोस यांनी हे गाणं लिहिलं आहे. हे गाणं रामचरण व ज्युनिअर एनटीआर यांच्यावर चित्रीत करण्यात आलं आहे. RRR या चित्रपटात देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीचा 1920 चा काळ या चित्रपटात दाखवला गेला आहे. अल्लुरी सीताराम राजू (रामचरण) आणि कोमाराम भीम (ज्युनियर एनटीआर) या दोन क्रांतिकारकांभोवती ही कथा फिरते. यामध्ये रामचरण, ज्युनियर एनटीआर यांच्यासोबतच आलिया भट्ट आणि अजय देवगण यांच्याही भूमिका आहेत.